राज्याचा निकाल 96.94; मुलींची बाजी
पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. 17) जाहीर झाला. यात एकूण 96.94 टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही कोकण विभाग अव्वल ठरला असून मुलींनी बाजी मारली आहे.
राज्यभरात एकूण 15,68,977 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 15,21,003 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात एकूण 122 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले असून 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 83,060 इतकी आहे. 24 विषयांचा 100 टक्के निकाल लागला आहे, तर तब्बल 12,210 शाळांचा निकाल 100 टक्के लागला.
ऑनलाइन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती, अटी, शर्ती हीींिं:/र्/ींशीळषळलरींळेप.ाह-ीील.रल.ळप या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे बोर्डाने म्हटले आहे.
मुंबई विभागत रायगड सरस
दहावीच्या परीक्षेत रायगड जिल्ह्याचा निकाल 97.35 टक्के लागला आहे. रायगडने मुंबई विभागात अव्वल येण्याचा मान मिळवला आहे. बारावीच्या परीक्षेतदेखील रायगडने मुंबई विभागात प्रथम क्रमांक मिळवला होता. जिल्ह्यात म्हसळा तालुक्याचा सर्वाधिक 99.02 टक्के निकाल लागला आहे. त्या खालोखाल अलिबाग 98.69%, महाड 98.60%, श्रीवर्धन 98.11%, पनवेल 97.61%, कर्जत 95.78, पेण 97.64%, तळा 97.59%, रोहा 97.41, सुधागड 97.39%, माणगाव 97.36%, उरण 97.35%, पोलादपूर 97.10%, खालापूर 95.40% व मुरूड 94.43% अशी निकालाची टक्केवारी आहे.
सीकेटी विद्यालयाचा 100 टक्के निकाल
पनवेल : दहावीच्या परीक्षेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक (जेबीएसपी) संस्थेचे नवीन पनवेल येथील सीकेटी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गव्हाण-कोपर येथील मोरू नारायण म्हात्रे व तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेज तसेच रयत शिक्षण संस्थेच्या कामोेठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा निकाल 100 टक्के लागला आहे. याबद्दल ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य तथा जेबीएसपीचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सीकेटी विद्यालयात 93.80 टक्के मिळवित प्राची बोरडे हिने प्रथम, 92 टक्के गुण प्राप्त करीत अथर्व नावडेकर व धनराज मोरे यांनी द्वितीय आणि 90.60 टक्के मिळवित सिद्धार्थ जाधव याने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेजमध्ये प्रेम मुंबईकर याने 88.80 टक्के गुण प्राप्त करीत प्रथम, मृदुला पाटील हिने 87.60 टक्के मिळवित द्वितीय आणि परी गुप्ता हिने 87.20 टक्के गुण मिळवित तृतीय क्रमांक पटकाविला. रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये रिया चिमणे हिने 93.80 टक्के मिळवित प्रथम, स्मृती पात्रो हिने 93.60 गुण मिळवित द्वितीय आणि सुयश पवार व सिद्धी टिके हिने 92 टक्के गुण मिळवित तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
श्री छत्रपती शिवजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये शशिकांत चौगुले याने 91.80 टक्के मिळवित प्रथम, सानिया अन्सारी व सिद्धी घरत यांनी 90.20 टक्के गुण मिळवित द्वितीय आणि प्रणिता भोसले हिने 90 टक्के गुण प्राप्त करुन तृतीय क्रमांक पटकाविला आहे.