महाड ः रामप्रहर वृत्त
वर्दळीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले रायगड जिल्ह्यातील कशेडी, ताम्हिणी, वरंध-वाघजाई व आंबेनळी घाट सातत्याने धोकादायक ठरत आहेत. पावसाळ्यात वाहनचालक व प्रवाशांना जीव मुठीत धरून या घाटातून प्रवास करावा लागतो. सतत कोसळणार्या दरडी व भूस्खलनामुळे घाटात वाहतूक ठप्प होण्याचे प्रकारही वारंवार होत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाट, माणगाव-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाट, महाड-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाट आणि महाड-पुणे-पंढरपूर मार्गावरील वरंध-वाघजई घाट वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. या घाटांतून मोठ्या प्रमाणात प्रवासी व मालवाहतूक सुरू असते. परंतु गेल्या काही वर्षांपासून हे घाट धोकादायक बनले आहेत. कशेडी घाटातून कोकण व गोव्याकडे सतत वाहतूक सुरू असते. गणेशोत्सवात तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. 2005 मध्ये घाटात दरड कोसळल्याने दहा दिवस वाहतूक ठप्प होती. या घाटातील रस्ता खचत असल्याने महामार्ग विभागाला सतत लक्ष ठेवावे लागते. सध्या महामार्ग रुंदीकरणात घाटाला बोगद्याचा पर्याय निर्माण होत असला तरी यंदाच्या पावसात प्रवाशांना कशेडी घाटातील अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. आंबेनळी घाटात प्रत्येक पावसाळ्यात दरड कोसळून वाहतूक ठप्प होते. असाच प्रकार वरंध-वाघजई घाटात घडतो. या ठिकाणीही दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे. गतवर्षी महाड व पुणे क्षेत्रात तब्बल 27 ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. त्यातच वरंध घाट अरुंद असल्याने दरड कोसळल्यानंतर वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. हा घाट अनेकदा वाहतुकीसाठी बंदही करावा लागतो. कशेडी घाट वगळता अन्य घाटात तातडीने मदतकार्य पोहचणे अवघड जाते. शिवाय या घाटांना पर्यायी मार्ग नसल्याने अतिदूरच्या मार्गाने वाहने वळवावी लागतात. यामुळे मनस्तापही सहन करावा लागतो.