लिओ कोलासो यांचा आरोप; मच्छीमार संघर्ष यात्रेचे मुरूडमध्ये जोरदार स्वागत
मुरूड : प्रतिनिधी
कोकण किनारपट्टीचे डिझेल परताव्याचे सुमारे 450 कोटी रुपये थकीत आहेत. राज्य सरकारच्या अशा नाकर्तेपणामुळे डिझेल परतावा रखडल्याचा आरोप महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो यांनी मंगळवारी (दि. 28) मुरूड येथील जाहीर सभेत केला.मच्छीमारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नॅशनल फिशवर्कर्स फोरम व महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या वतीने पालघर (झाई) ते मालवणपर्यंत संघर्ष यात्रा काढण्यात आली असून, या संघर्ष यात्रेचे मंगळवारी मुरूडमध्ये स्थानिक मच्छीमार संस्थेच्या पदाधिकार्यांनी स्वागत केले. या वेळी झालेल्या सभेत लिओ कोलासो बोलत होते. मच्छीमारांना हक्क मिळवून देणारा कायदा करावा, राज्य शासनाने एलईडीद्वारे मासेमारी करणार्यांचे व्हीआरसी व नौका जप्ती करण्याच्या कायद्यात सुधारणा करावी आदी मागण्या त्यांनी या वेळी केल्या. राष्ट्रीय सरचिटणीस ओलांसो सिमॅनस, मुरूड तालुका कोळी समाज अध्यक्ष पांडुरंग आगरकर यांचीही या वेळी समयोचित भाषणे झाली.संघर्ष यात्रेत महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो, उपाध्यक्ष रामकृष्ण तांडेल, राष्ट्रीय सरचिटणीस ओलांसो सिमॅनस, सरचिटणीस किरण कोळी, मुंबई महिला संघटक उज्वला पाटील, रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले, उल्हास वटकरे (रायगड) मानेंद्र आरेकर (पालघर) मुरूड तालुका कोळी समाज अध्यक्ष पांडुरंग आगरकर, विजय गिदी, मनोहर मकू यांच्यासह कोळी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.