वस्तूंच्या वापराविषयी मार्गदर्शन
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका क्षेत्रात नुकतीच एकल वापर (सिंगल बुज) प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. माजी महापौर डॉ. कविता चौतमोल व आयुक्त गणेश देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रतिबंधित प्लास्टिकची साठवणूक, विक्री आणि वापर करणार्यांवर महानगरपालिकेच्यावतीने कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सामान्य नागरिकांना, व्यापारीवर्गाला, विद्यार्थ्यांना या प्लॅस्टिक बंदीमध्ये कोणकोणत्या वस्तुंचा समावेश होता व कोणकोणत्या वस्तुंना परवानगी आहे. याविषयी मार्गदर्शन होण्याकरिता आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 31 जुलैपर्यंत मार्गदर्शनपर प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयानेअधिसूचना जारी केली आहे, तसेच सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016 नियम 4(2) अन्वयानुसार 1 जुलै 2022 पासून एकल वापर (सिंगल युज) प्लास्टिकचे उत्पादन,आयात, साठवण,वितरण विक्री आणि वापरांवर बंदी असणार आहे.
नागरिकांमध्ये प्लास्टिक बंदीविषयी जागृती निर्माण करण्याकरिता महापालिकेच्यावतीने विविध एनजीओची मदत घेतली जात आहे. तसेच नुकतेच आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात व्यापारीवर्गाची एकदिवसीय कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले होते. उपायुक्त सचिन पवार आणि महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे रायगड जिल्ह्याचे प्रादेशिक अधिकारी व्हि. व्हि. किल्लेदार, क्षेत्रीय अधिकारी, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते यांनी मार्गदर्शन केले. व्यापारीवर्गांच्या विविध शंकाचे निरसन या वेळी करण्यात आले होते.
प्लास्टिक बंदीची अमंलबजावणी करण्याकरिता महापालिकेच्यावतीने चारही प्रभागामध्ये विविध पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके त्या त्या ठिकाणी असणार्या सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. या कारवाईमध्ये पहिला गुन्हा नोंद झाल्यावर 5 हजार रुपये, दुसरा गुन्हा नोंद झाल्यावर 10 हजार रुपये ,तिसरा गुन्हा नोंद झाल्यावर 25 हजार रूपये दंड आणि तीन महिन्याचा कारावास असणार आहे.
या प्रदर्शनामध्ये प्लास्टिकबंदी असणार्या विविध वस्तूंची माहिती देणारे बॅनर ठेवण्यात आले असून, प्लास्टिकबंदी असणारे विविध वस्तुही ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी या प्रर्दशनाला भेट देऊन माहिती घ्यावी. -गणेश देशमुख, आयुक्त
प्लास्टिकबंदी असणार्या वस्तू
अ) प्लास्टिकच्या कांडयासह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लॉस्टिकच्या कांड्या, प्लास्टिकचे झेंडे, कॅडी कांड्या, आईस्क्रीम कांड्या. हँडल असलेल्या किंवा नसलेल्या प्लॅस्टिक पिशव्या, ब) सजावटीसाठी प्लास्टिक व पॉलिस्टीरीन (थर्माकोल) क) प्लास्टीक कंटेनर (डबे), प्लेट्स, बाऊल, ग्लासेस, कटलरी, जसे काटे, चमचे, चाकू, पिण्यासाठी स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या, (स्टिरर्स), मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड, सिगारेटची पाकिटे यांची प्लास्टिक आवरणे, प्लास्टिकच्या पीव्हीसी बॅनर (100 मायक्रॉनपेक्षा कमी).