Breaking News

नवी मुंबईत होणार महाराष्ट्र भवन

 आमदार मंदा म्हात्रे यांच्या मागणी व पाठपुराव्यास यश

नवी मुंबई : प्रतिनिधी

वाशी येथील आरक्षित भूखंडावर भव्य महाराष्ट्र भवन उभारण्याकरिता चालू अर्थसंकल्पीय वर्षात निधीची तरतूद करण्यात यावी, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार  मंदा म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांजकडे मागणी केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी वाशी नवी मुंबई येथे भव्य, सुसज्ज व सर्व सुविधांयुक्त अशी महाराष्ट्र भवन वास्तूच्या निर्माणाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर जाहीर घोषणा केली.

महाराष्ट्र भवन निर्मितीसाठी 26 कोटी 32 लाख निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. या वास्तूच्या बांधकामासाठी अतिरिक्त निधीचीही तरतुद करण्यात येणार आहे. आमदार मंदा म्हात्रे यांच्या मागील 10 वर्षांच्या पाठपुराव्यास यश आले असून लवकरच महाराष्ट्र भवनाची वीट उभारली जाणार आहे. या भवनाचा फायदा नवी मुंबईसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून येणार्‍या नागरिकांनाही होणार आहे.

या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, नवी मुंबई शहर उभारताना सिडको मार्फत वाशी येथे राज्यनिहाय भवन निर्मितीसाठी भूखंड उपलब्ध करून दिले गेले. राज्यनिहाय दिल्या गेलेल्या सर्व राज्यांची भवने नवी मुंबईत उभारली गेली. महाराष्ट्र भवन निर्मिती करण्यात आली, तर याचा लाभ महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून प्रशासकीय कामासाठी येणार्‍या जनतेला होईल. यासाठी  आपण नवी मुंबईतील वाशी ठिकाणी महाराष्ट्र भवन निर्माण व्हावे यासाठी 10 वर्षांपूर्वी मागणी केली. सिडकोने ही महाराष्ट्र भवन उभारणे करिता 8000 स्क्वे. मी. चा भूखंड नवी मुंबईतील मध्यवर्ती वाशी या ठिकाणी आरक्षित केला. परंतु आजपर्यंत सदर भूखंडावर महाराष्ट्र भवन निर्मितीसाठी एक वीटही रचण्यात आलेली नाही, ज्याची या राज्याची नागरिक म्हणून नवी मुंबईकरांसमवेत मलाही व्यक्तीगत खंत आहे.

कोंकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र अशा विविध ठिकाणांहून नागरिक कामांसाठी मुंबई येथे येत असतात. त्याकरिता मुंबईच्या जवळपास या भवनाची निर्मिती होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र भवन असते तर कोविडसारख्या आपत्तीकाळात मुंबई जवळच्या वाशी शहरात डॉक्टर, अधिकारी आदींना हजारो कोरोनाग्रस्त रुग्णांना गतीने सेवा देणे शक्य झाले असते, असे आमदार म्हात्रे यांनी सांगितले.

मागील वर्षी अधिवेशन काळात पुरवणी मागणीद्वारे आपण महाराष्ट्र भवन मागणीचा विषय लावून धरला होता. माझ्या पाठपुराव्यास यश आले असून या निधीची तरतूद करून दिल्याने नवी मुंबईत सुसज्ज व भव्य अशी महाराष्ट्र भवनची वास्तू निर्माण होणार आहे. नवी मुंबईतील अनेक संस्था, संघटना, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग व विद्यार्थी यांनी प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनीवरून आभार मानले.

-आमदार मंदा म्हात्रे

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply