अपुर्या साधनसामग्रीमुळे दुरुस्तीचे काम कोमात
खालापूर : प्रतिनिधी
पावसाने मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील खालापूर ते खोपोली या दोन किलोमीटर अंतरात खड्ड्यांनी शंभरी गाठली आहे. हे खड्डे भरण्यासाठी 10 मजूर व एकच रोलर फिरत असून, खड्डे भरले की पुन्हा तेच खड्डे मोठे होत असल्याने मागे पाठ पुठे सपाट अशी अवस्था झाली आहे.
मुंबई-पूणे राष्ट्रीय महामार्गावरील खालापूर ते खोपोली फाटा या सात किलोमीटर रस्त्याच्या दुपदरिकरणाचे काम 2017 मध्ये सुरू झाले होते. कामाच्या निकृष्ट दर्जामुळे सध्या या रस्त्याची दूरावस्था झाली आहे. खालापूर ते खोपोली रस्त्याची देखभाल व दुरुस्ती 2023 पर्यंत ईगल इन्फ्रा कंपनीकडे आहे.
पावसामुळे या महामार्गावर खालापूर ते महडपर्यंत जवळपास शंभरपेक्षा अधिक खड्डे पडले असून शनिवारी खोपोलीच्या दिशेने जाणारी दुचाकी खड्ड्यात आपटून अपघात झाल्याची घटना घडली. त्या अगोदर दुचाकी अपघातात महिलेचा जीव गेला होता. त्यावेळी ठेकेदारा विरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी खालापूर पोलीस ठाण्यात नागरिक आक्रमक झाले होते.
खालापूर-खोपोली दरम्यानच्या महामार्गाची दुरुस्ती व्हावी, यासाठी खालापूर तहसील कार्यालयात परिसरातील नागरिक व रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व ठेकेदार या़च्यात किमान 15 बैठका झाल्या आहेत. परंतु त्यानंतर देखील ठेकेदार निष्क्रिय असल्याने संताप व्यक्त होत आहे.
पावसाळ्यात खालापूर-खोपोली रस्ता अतिशय दयनीय होतो, हे माहिती असतानादेखील ठेकेदारांने अगोदर आवश्यक काळजी न घेतल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
-मनोज कळमकर, सामाजिक कार्यकर्ते, खालापूर
पाऊस थांबला की लगेच खड्डे बुजविण्याचे काम हाती घेत असून त्यासाठी रोलरचा वापरदेखील करीत आहोत.
-कल्पेश पाटील, साईड व्यवस्थापक, ईगल इन्फ्रा कंपनी