शिक्षक परिषदेची माणगाव येथे बैठक
अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्हा शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या जिल्हा कार्यकारिणीची सभा माणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत प्राथमिक शिक्षकांना भेडसावणार्या समस्या आणि प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
सुरूवातीला संघटनेच्या वतीने तालुका पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षकांची फंड प्रकरणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गेली सहा महिने प्रलंबित आहेत, त्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. शिक्षणसेवक शिक्षकांच्या कपात रक्कम हिशेब प्रिंट काही तालुक्यांमध्ये प्राप्त झालेल्या नाहीत. स्थायी प्रमाणपत्र मंजुरी, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव आणि आवश्यक असणारे ऑनलाइन प्रशिक्षण, शालेय पोषण आहार यासाठी राज्यस्तरावर संघटनेच्या वतीने पाठपुरावा करणे तसेच चक्रीवादळांमुळे जिल्ह्यातील शाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यात शाळांची कागदपत्रे, दफ्तर यांचे नुकसान झाले आहे. अशातच शासनाने पाच वर्षांचे ऑडीट लावले आहे, यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.
दरमहा होणारे वेतन, नवीन प्रणाली आणि त्यातील त्रुटी तसेच सोसायटी कपात रक्कम याबाबत विचार विनिमय करण्यात आला. उच्च शिक्षण परवानगी प्रस्ताव प्रलंबित असल्याबाबत माहिती देण्यात आली.
सप्टेंबर 2022 मध्ये तीन वर्षे पूर्ण होणारे शिक्षणसेवक, प्राथमिक शिक्षक वेतनश्रेणी प्रस्ताव, मंजुरीसाठी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करावा, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शिक्षकांची प्रलंबित मेडीकल बिले आणि आवश्यक निधीची तरतूद यासाठी शिक्षण संचालक कार्यालय पुणे येथे राज्यस्तरीय पाठपुरावा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
संघटनेचे कोकण विभाग कार्याध्यक्ष संदीप शिंदे, कार्यवाह उमेश महाडेश्वर, राज्य प्रसिध्दी प्रमुख रविकिरण पालवे, जिल्हा कार्यवाह विजय पवार, संघटनमंत्री वैभव कांबळे, जितेंद्र बोडके, उदय गायकवाड, भिकाजी मांढरे, संजय कोंडविलकर, दिप्ती गावंड, स्मिता जोष्टे, समीर होडबे, सुहास चांदोरकर, बालाजी गुबनरे, गणेश निजापकर, विजापूरे, सुधाकर करकरे, पंकज निकम, बाळा पाबरेकर, सुजित भोजने, रमेश देठे आदि पदाधिकारी व सभासद या बैठकीला उपस्थित होते.