ठेकेदाराचे रात्रीस खेळ चाले
खालापूर : प्रतिनिधी
खालापूर नगरपंचायत हद्दीत सध्या खोदकाम करून गॅस वाहिन्या टाकण्याचे काम दिवस-रात्र सुरू आहे. रात्रीच्या वेळेस मशिनच्या आवाजाने नागरिकांची झोपमोड होत आहे. तसेच वयोवृद्ध, रुग्णांना त्रास होत आहे. त्याबद्दल तक्रार करणार्यांना ठेकेदार दमबाजी करून खोटी पोलीस केस दाखल करण्याची धमकी देत आहेत.
महानगर गॅस कंपनीचे सध्या भर पावसात खालापूर नगरपंचायत हद्दीतील शासकीय निवासस्थान ते रोहिदास वाडा या परिसरात गॅसवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी जेसीबीने रस्त्याच्या साईडपट्टीवर खोदकाम केले जात आहे. मात्र गॅस वाहिनी टाकल्यानंतर केवळ माती टाकून खोदाई केलेल्या भाग बुजवून टाकला जात आहे. आधीच पावसाने भुसभुशीत झालेला भाग आणि तात्पुरती उपाययोजना यामुळे साईडपट्टी खचून अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
गॅसवाहिन्या टाकण्यासाठी जेसीबीने रात्रंदिवस काम सुरू आहे. खालापूर गावात मोठ्या संख्येने शासकीय अधिकारी, कर्मचारी व नोकरदार रहात असून त्यांची जेसीबीच्या आवाजाने रात्री झोपमोड होते. त्यामुळे कामावर दांड्या व आरोग्यावर परिणाम होत आहे.
खालापूर शहरातून कायम अवजड वाहनासह इतर वाहतुकीची वर्दळ असते. गॅसवाहिनी टाकल्यानंतर खोदलेल्या भागावर केवळ माती टाकून ठेकेदार जुजबी उपाययोजना करत आहे. त्यामुळे रस्ता खचून अपघाताची शक्यता असल्याने नगराध्यक्ष रोशना मोडवे, स्थायी सभापती किशोर पवार, बांधकाम सभापती सुनिता पाटील यांनी कामाच्या ठिकाणी पाहणी करत ठेकेदाराला असुरक्षित काम बंद करण्याचे आदेश दिले होते. परंतु ठेकेदारांनी पुन्हा काम सुरू केले आहे. दरम्यान, या कामाच्या ठेकेदाराला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.
गॅसवाहिनी टाकण्याच्या कामात ठेकेदार सुरक्षा नियम पाळत नाही, दिवस-रात्र मनमानी काम करतो. लोकवस्तीत खोदकाम सुरू असून त्यासाठी वापरण्यात येणार्या जेसीबीचा आवाज एक किलोमीटर अंतरापर्यत जातो. या आवाजाचा नागरिकांना त्रास होत आहे.
-मनोज कळमकर, ग्रामस्थ, रोहिदास नगर, खालापूर
गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम रात्रीही सुरू असून ठेकेदार नियमांचे उल्लंघन करीत आहे. मात्र कामाच्या नियम व अटीबाबतच्या कागदपत्रांची मागणी केली असता साईड देखरेखदाराची भंबेरी उडाली.
-स्वामीनाथ पाटील, ग्रामस्थ, खालापूर