Breaking News

समुद्रकिनार्‍यांची यांत्रिक पद्धतीने होणार स्वच्छता; एक यंत्र अलिबागेत दाखल

अलिबाग ः प्रकाश सोनवडेकर

राज्यातील समुद्रकिनार्‍यांची स्वच्छता यांत्रिक पद्धतीने होणार आहे. त्याकरिता कोकणातील सात जिल्ह्यांसाठी सात यंत्र उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यापैकी एक यंत्र रायगड जिल्ह्यासाठी दाखल झाले असून पुढील काही दिवस ते अलिबाग समुद्र किनार्‍याची स्वच्छता करणार आहे. समुद्रकिनार्‍यांच्या स्वच्छतेसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने पुढाकार घेतला आहे. समुद्रकिनार्‍यांची स्वच्छता राखणे स्थानिक प्रशासनांसाठी मोठे जिकरीचे काम ठरत होते. मनुष्यबळाचा वापर करून विस्तीर्ण समुद्र किनार्‍यांची स्वच्छता राखणे शक्य होत नाही.  सामाजिक संस्थांच्या मदतीने अधूनमधून समुद्र किनार्‍यांची स्वच्छता मोहीम राबविली जाते, मात्र यात सातत्य राखणे अवघड असल्याने किनारे अस्वच्छ राहण्याचे प्रमाण मोठे असते. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियामक मंडळाने पहिल्यांदाच समुद्रकिनार्‍यांच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला असून किनार्‍यांच्या स्वच्छतेसाठी अधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली आहे. कोकण किनारपट्टीवरील सात जिल्ह्यांसाठी सात बॉबकॅट नामक यंत्र उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. 90 लाख रुपये किमतीची सात मशिन्स प्रत्येक जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यातील एक मशिन नुकतेच रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे वि. वि. किल्लेदार, क्षेत्र अधिकारी योगेश देशमुख आदी उपस्थित होते.

विविध कामे केली जाणार

या मशिनच्या माध्यमातून समुद्र किनार्‍यांची स्वच्छता केली जाईल. कचरा उचलणे, त्याचे संकलन करणे, संकलित केलेल्या कचर्‍याची विल्हेवाट लावणे, वाळूत साचलेला कचरा जमा करणे, वाळूचे सपाटीकरण करणे यासारखी कामेही केली जाऊ शकणार आहेत. पुढील एका वर्षासाठी यंत्राच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्चही महाराष्ट्र प्रदुषण नियामक मंडळामार्फत केला जाणार आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply