मागील तीन वर्षांपासून विश्रामगृह रिकामेच
मुरूड ः प्रतिनिधी
मुरूड हे पर्यटनस्थळ असून येथे मंत्रालयातील अनेक मान्यवर तसेच शासकीय अधिकार्यांची ये-जा सुरू असते, परंतु शासनाने बांधलेल्या शासकीय विश्रामगृहाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने अधिकारी वर्गाला खासगी लॉजिंगमध्ये आसरा घ्यावा लागत आहे.
कोविड 19पासून मुरूडच्या शासकीय विश्रामगृहाचा ताबा ग्रामीण रुग्णालयाने घेतला होता. कोरोनाच्या रुग्णांना इलाज करण्यासाठी विश्रामगृह वापरात आणले जात होते, परंतु आज कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असतानासुद्धा मुरूड येथील सार्वजनिक बांधकाम खात्यास जाग येत नसून हे विश्रामगृह बंद स्थितीतच ठेवण्यात आले आहे. मागील तीन वर्षांपेक्षा जास्त काळ हे विश्रामगृह बंद असल्याने त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.
मुरूडला भेटी देणारे मंत्री, लोकप्रतिनिधींना खासगी इमारतीमध्ये कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घ्याव्या लागत आहेत. समुद्रकिनारी असणारे शासकीय विश्रामगृह सर्वाना आवडीचे व राहण्याची उत्तम व्यवस्था असणारे ठिकाण असूनदेखील या विश्रामगृहाच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
या विश्रामगृहात अजूनही रुग्णालयातील लोखंडी खाटा व इतर सामानसुद्धा हटवण्यात आले नाही. त्यामुळे या विश्राम ृहात अडगळ वाढली असून सर्व रूमची दुरवस्था झाली आहे.
निधीची आवश्यकता
मुरूड सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता गोरे यांना विचारणा केली असता, विश्रामगृह कोविड 19साठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताब्यात आहे. ज्यावेळी रुग्णसंख्या वाढत होती त्यावेळी रुग्णांची सुविधा या विश्रामगृहात करण्यात आली होती. अजूनपर्यंत याचा ताबा आम्हाला देण्यात आलेला नाही. जरी ताब्यात दिले तरी या विश्रामगृहाच्या दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता भासणार आहे. दुरुस्ती झाल्यावरच याचा वापर करता येईल.