Breaking News

पनवेल पनपा क्षेत्रात विकसित होणार केणीपट्टा

पनवेल ः प्रतिनिधी

पुण्याच्या मगरपट्टा सिटीच्या धर्तीवर पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पेठाली गावातील केणी कुटुंबीय केणीपट्टा (नगर) विकसित करतील, असा विश्वास माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी व्यक्त केला. मगरपट्टा सिटीला भेट देऊन सतीश मगर यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते बोलत होते. पुण्याजवळील मगरपट्टा शहर अशी एक टाउनशिप आहे जी सोयीसुविधांमुळे कोणत्याही नामांकित बिल्डरच्या टाऊनशिपला मागे टाकते. विशेष म्हणजे ही टाऊनशिप शेतकर्‍यांनी वसवली असून सतीश मगर यांनी योजना राबविली आहे. याच धर्तीवर पनवेल महापालिका क्षेत्रातील केणी कुटुंबीयांनी पुढाकार घेतला आहे. स्थानिक शेतकरी तसेच पालिकेतील माजी नगरसेवक हरेश केणी यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे ही संकल्पना मांडली. 29 गावांचा समावेश असलेल्या पनवेल महापालिकेचा विकास करताना शहर आणि ग्रामीण भागाचा समांतर विकास करणे आवश्यक असल्याने आयुक्त देशमुख यांनी याबाबत पालिकेच्या माध्यमातून पूर्णपणे सहकार्याची भूमिका घेतली आहे. पनवेल तालुक्यातील तळोजा पेठाली गावातील केणी कुटुंबीयांची शेकडो जमीन सध्याच्या घडीला अस्तित्वात आहे. यापैकी काही जमीन सिडकोने संपादित केली आहे, तर उर्वरित जमीन अद्याप शिल्लक आहे. या जमिनींना सोन्याचा भाव प्राप्त झाला असताना संबंधित जमीन ही बांधकाम व्यावसायिकांना विकसित करण्यासाठी देण्याऐवजी आपणच विकसित करण्याचा निर्णय केणी कुटुंबीयांनी घेतला आहे. प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांनी नेहमीच स्थानिक शेतकर्‍यांना उद्योजक बनण्याचे धडे दिले. या पार्श्वभूमीवर ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी अद्याप शिल्लक आहेत अशा शेतकर्‍यांसाठी केणी कुटुंबीयांनी उचलेले पाऊल रोल मॉडेल ठरणार आहे. माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, पापा पटेल, रवींद्र म्हात्रे तसेच चेतन जाधव, अभिजित जाधव यांनी शनिवारी (दि. 30) पुण्याला जाऊन सतीश मगर यांची भेट घेतली. या वेळी मगरपट्टा वसवण्यासाठी काय करावे लागले, तेव्हा कोणत्या अडचणी आल्या याबाबत सतीश मगर यांच्याशी विस्तृत चर्चा करण्यात आली. त्यानंतर परिसराला भेट देऊन तेथे करण्यात आलेल्या विविध सुधारणांची माहितीही घेण्यात आली.

मगरपट्टातील व्यवस्था कौतुकास्पद -परेश ठाकूर

आमच्याकडे आलेल्या प्रशासकीय व पोलीस अधिकार्‍यांकडून मगरपट्टा सिटीची माहिती मिळाली. आमदार प्रशांत ठाकूर व आयुक्त गणेश देशमुख यांनीही तेथील व्यवस्था चांगली असल्याचे सांगितले. त्यामुळे परदेशात जाण्यापेक्षा आज आम्ही येथे भेट देऊन सतीश मगर यांच्याशी चर्चा केली. येथील शेतकर्‍यांचा झालेला आर्थिक विकास पाहायला मिळाला. कचर्‍याची विल्हेवाट लावताना त्यातून वीज निर्माण करून खर्च कसा वाचवला जातो याची माहिती शर्मा यांनी दिली. इथली सगळी व्यवस्था कौतुकास्पद आहे. त्यांनी आपल्या भागधारकांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. केणी परिवारही पनवेल परिसरात अशा प्रकारे शेतकर्‍यांच्या मनात विश्वास निर्माण करून केणीपट्टा उभारू शकतील, असा विश्वास पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी व्यक्त केला.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply