मुंबई : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील रिलायन्स इथेन गॅस प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी विविध स्तरावर पाठपुरावा करीत असून अनेक आंदोलने, उपोषणे करून या अन्यायग्रस्त शेतकर्यांचा लढा सुरू आहे. या संदर्भात भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने गुरुवारी (दि. 6) रायगडचे पालकमंत्री उदय सांमत यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी रिलायन्स कंपनी अधिकारी आणि शेतकरी यांच्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शेतकर्यांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांनी पालकमंत्र्यांसमोर सविस्तर विषय मांडून कशा प्रकारे कंपनीने शेतकर्यांची फसवणूक केलेली आहे याबाबत माहिती दिली व या विषयी तातडीने न्याय मिळावा, अशी विनंती केली. याची दखल घेत पालकमंत्र्यांनी रिलायन्स प्रशासनाला ठणकावले आहे.
या बैठकीला रायगडचे जिल्हाधिकारी, कर्जतचे तहसीलदार, रिलायन्स इथेन गॅस प्रकल्पाचे सक्षम अधिकारी अनिल सावंत, रिलायन्स कंपनीचे अधिकारी हितेन रॉय, कुमारवेल यांच्यासह कर्जत येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांचे नेतृत्व करणारे केशव तरे, राजेश भगत, दीपक बेहरे, किरण ठाकरे तसेच शेतकरी रमेश कालेकर, सुरेश खाडे, रघुनाथ तरे, गणेश तरे, उमेश राणे आदी उपस्थित होते.
या प्रकल्पात कशा प्रकारे शेतकर्यांची फसवणूक करण्यात आली याबाबत शेतकर्यांनी पालकमंत्र्यांसमोर यादीच बैठकीत मांडली. यावर पालकमंत्री यांनी तातडीने जिल्हाधिकार्यांनी बैठक बोलावून कंपनीने कशा प्रकारे जमीन अधिग्रहित केली आहे याचा अहवाल मागवला आहे तसेच आमची बांधिलकी शेतकर्यांशी असून त्यांना न्याय मिळवून देणे हे आमचे कर्तव्य असल्याने कंपनी शेतकर्यांना न्याय देणार नसेल, तर कंपनी प्रशासनाची हयगय न करता शासकीय नियमावलीनुसार त्यांना वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही, असे स्पष्ट करून प्रकल्पाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
Check Also
संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर …