पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे शैक्षणिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी येथे केले.
पनवेल शहरातील श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पनवेल महापालिका हद्दीतील 10 शाळांतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप पनवेल येथील श्री साईबाबा मंदिर येथे करण्यात आले. त्या वेळी परेश ठाकूर बोलत होते. या कार्यक्रमास माजी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे, श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष खेमचंद गोपलाणी, सेक्रेटरी रामलाल चौधरी, उपाध्यक्ष राम थदानी उपस्थित होते.
पुढे बोलताना परेश ठाकूर म्हणाले की, सामाजिक बांधिलकी म्हणून अखंडपणे हा शैक्षणिक उपक्रम राबविला जात आहे. या शैक्षणिक साहित्यातून विद्यार्थ्यांनी मनापासून मोठे व्हावे. हा शैक्षणिक उपक्रम राबवून समाजाला सोबत घेऊन जाण्याचे काम श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्ट करत असून ही पनवेलकरांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.
श्री साईबाबा मंदिर पनवेल येथे पनवेल शहर, कोळेश्वर विद्या मंदिर, मोठा खांदा, धाकटा खांदा, तक्का, पोदी, गुजराती, उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी 10 शाळांतील शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे या शिक्षकांना शिर्डी यात्रेचेही आयोजन श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे, अशी माहिती श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे सेक्रेटरी रामलाल चौधरी, उपाध्यक्ष राम थदानी यांनी दिली.