पेण : प्रतिनिधी
पेण पोलिसांनी सापळा रचून गुटखा माफियाला अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सूनावली आहे. पंकज उपाध्याय असे या गुटखा माफियाचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडील केसरयुक्त पानमसाला, विमल तंबाखु, रंजनीगंधा पानमसाला असा एकुण 22 हजाराचा माल जप्त केला आहे.
पंकज उपाध्याय (रा. करंजाडे, ता. पनवेल, मुळ रा. उत्तरप्रदेश) हा त्याच्या अॅक्टीवा (एमएच-46, बीसी-9086) गाडीने मुंबई-गोवा महामार्गावरून खारपाडा येथून पेण बाजूकडे येणार असल्याची खबर पेण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार डिवायएसपी नितीन जाधव, पोलीस निरीक्षक धनाजी क्षिरसागर, उपनिरीक्षक विजय धुमाळ, सहाय्यक निरीक्षक वेडे, हवालदार सतिश मेहतर यांच्या पथकाने तरणखोप गावाजवळ सापळा रचून पंकज उपाध्याय याला पकडले.
या वेळी त्याच्या अॅक्टीवा गाडीवरील पुठ्ठयाच्या बॉक्समध्ये केसरयुक्त पानमसाला, विमल तंबाखु, रंजनीगंधा पानमसाला असा एकुण 22 हजाराचा माल आढळला. तो पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने पंकज उपाध्याय याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सूनावली आहे.