पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त सोमवारी (दि. 8) विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम कुंदन राम मोकल, द्वितीय अपर्णा मंदार देवकुळे, तृतीय शशिकांत बापू पाटील यांनी बाजी मारली. या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांसह अनिल कृष्णा कोळी, नंदिता निवास म्हात्रे, अपर्णा सतीश नाईक व अन्य 12 पालक स्पर्धा सहभागी झाले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रसन्न ठाकूर, प्रणाली पाटील व हर्षला पाटील यांनी काम पाहिले. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्या साधना डोईफोडे यांच्यासह रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य रवींद्र भोईर, संस्थेच्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर, जुनिअर कॉलेज विभाग प्रमुख बाबुलाल पाटोळे यांचेसह उपशिक्षिका चारुशीला ठाकूर, क्रीडाशिक्षक जयराम ठाकूर, अर्चना पाटील व सेवक आनंद खारकर आदी उपस्थित होते. पालकांसाठी आयोजित केलेल्या या वक्तृत्व स्पर्धेच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्या साधना डोईफोडे यांनी विजयी स्पर्धकांचे अभिनंदन करून त्यांचा सन्मान केला.