चेअरमन अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त
बहीण-भावाच्या पवित्र नात्याची ओळख असणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या सणानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक राख्यांच्या प्रदर्शनाचे बुधवारी (दि. 10) भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन आणि ‘रयत’चे जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.
विद्यार्थ्यांनी टाकाऊ तसेच सहज उपलब्ध होणार्या वस्तूंपासून तयार केलेल्या विविध रंगांच्या व आकारांच्या राख्यांच्या प्रदर्शनाची अरुणशेठ भगत यांनी पाहणी केली व विद्यार्थ्यांच्या कलात्मकता व कल्पकतेची प्रशंसा केली. त्यांच्यासमवेत ज्येष्ठ नेते जयवंत देशमुख व शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष नामदेव ठाकूर यांनीही कुतूहलाने प्रदर्शन पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मान्यवरांनी राख्यांची खरेदीही केली.
प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी विद्यालयाच्या प्राचार्य साधना डोईफोडे, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य प्रमोद कोळी व रवींद्र भोईर, संस्थेच्या लाईफ वर्कर व विद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख ज्योत्स्ना ठाकूर, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, जुनिअर कॉलेजचे प्रा. राजेंद्र चौधरी, विद्यालयाचे ग्रंथपाल महेश म्हात्रे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी अत्यंत मेहनतीने आणि कलाकुसरीने या राख्या बनवल्याची प्रातिनिधिक प्रतिक्रिया विद्यालयातील इयत्ता आठवी अ या वर्गातील विद्यार्थिनी श्रावणी नाईक हिने व्यक्त करून या पवित्र सणानिमित्त सर्व तरुणांचा, समाज बांधवांचा महिलांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन मानवीय, बंधूत्वाचा आणि बहीण-भावाच्या नात्याचा सन्मान करणारा ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रदर्शनानंतर वर्गावर्गात विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला.