Breaking News

खोपोलीतील स्मशानभूमी मरणासन्न

निसरडा परिसर, ओली लाकडे व बंद डिझेल दाहिनी

खालापूर : प्रतिनिधी

शहरासाठी एकमेव असलेल्या खालच्या खोपोलीतील  स्मशानभूमीत ओली लाकडे, अपुरी प्रकाश व्यवस्था आणि बंद डिझेल दाहिनी यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या मृताच्या नातेवाईकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या स्मशानभूमीचा परिसर निसरडा झाल्यामुळे अनेक जण घसरून जखमी झाले आहेत.

खालच्या खोपोलीतील अग्निशमन दल केंद्राशेजारी शहरासाठी एकमेव स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीतील डिझेल दाहिनी गेल्या अनेक दिवसापासून बंद आहे.   त्यामुळे ओल्या लाकडांच्या सरणावरच मृतदेहावर अंतीम संस्कार करावे लागत आहेत. ही ओली लाकडे जळत नसल्याने शवदहनासाठी जुन्या टायरचा वापर करावा लागतो.

ओली लाकडे आणि टायर जळताना धुराचे लोट निर्माण होतात. या धूरामुळे डोळ्यांच्या विकारांना सामोरे जावे लागत आहे. तर अ‍ॅड. मुनिदास गायकवाड यांनी सांगितले की, लाकडे ओली असल्यामुळे ती जळत नाहीत, त्यामुळे मृतदेहाचे पुर्ण दहन झाले आहे की नाही, हे पहाण्यासाठी नातेवाईकांना पुन्हा स्मशानभूमीत यावे लागत आहे.

या स्मशानभूमीतील डिझेल दाहिनीच्या उंच चिमणीमध्ये बिघाड असून त्यामुळे मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे. नगर परिषदेने बिल अदा केले नसल्याने ठेकेदार या डिझेल दाहिनीची दुरुस्ती करण्यास टाळाटाळ करीत आहे, असा आरोप माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांनी केला आहे. बंद असलेली डिझेल दाहिनी सुरू व्हावी, यासाठी जनआंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

खालची खोपोली येथील स्मशान भूमीतील बंद असलेली डिझेल दाहिनी तात्काळ दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, दोन दिवसांत ते काम पुर्ण होईल. या स्मशानभूमीतील लाकडे ओली नाहीत, फक्त पाण्याने भिजली आहेत.

-अनूप दुरे, प्रशासक, खोपोली नगर परिषद

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply