पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील सीकेटी विद्यालयाच्या प्राथमिक विभाग इंग्रजी माध्यमाच्या वतीने देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका निलिमा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या वेळी पंचायत समिती सदस्य व भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नाताई घरत, शहर अध्यक्ष वर्षा नाईक, महिला सरचिटणीस लिना पाटील, इंग्रजी माध्यमिकचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, मराठी प्राथमिकचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, पालक प्रतिनिधी जयंत पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, नारळ वाढवून करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून रत्नप्रभा घरत यांनी आपल्या भाषणातून आपला स्वातंत्र्य लढा मौल्यवान आहे, तसेच स्वातंत्र्याची गाथा ही संघर्ष, धैर्य आणि शौयाची असल्याचे सांगितले. मुख्याध्यापिका निलिमा शिंदे यांनी अमृतमहोत्सवी वर्ष हा ऐतिहासिक टप्पा असल्याचे सांगितले. ब्रिटीशांच्या वर्चस्वातून मुक्त झाल्यानंतर नव्या भारताच्या उभारणीचा रस्ता अधिक प्रशस्त करावयाचा असल्याचे आहे, तसेच हे वर्ष भारतीयांसाठी अनेकार्थी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. स्नेहल कडव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शबुना शेट्टी व अनघा भोसले यांनी केले. या वेळी विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले. प्रियंका नायर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.