पनवेल : प्रतिनिधी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्यात ‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत बुधवारी (दि. 17) समूह राष्ट्रगीत गायन उपक्रम एकाच वेळी पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी राबविण्यात आला. पनवेल महापालिका हद्दीमध्ये हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या अंतर्गतच महाराष्ट्र शासनाच्यावतीने 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान ‘स्वराज्य महोत्सव’उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये घरोघरी तिरंगा, रॅली, फाळणी वेदना स्मृतीदिनानिमित्त प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन महापालिकेच्यावतीने करण्यात आले. बुधवारी ‘समूह राष्ट्रगीत गायन’ उपक्रम सकाळी 11.00 ते 11.01 या एका मिनिटांमध्ये एकाच वेळी पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील महापालिका मुख्यालय, चारही प्रभागातील मॉल्स, शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, मंदिरे अशा विविध ठिकाणी राबविण्यात आला. यासाठी महापालिकेच्यावतीने अधिकारी, कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. ओरियन मॉल पनवेल येथे प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त विठ्ठल डाके, तहसिलदार विजय तळेकर, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, ओरियन मॉलचे मंगेश परूळेकर तसेच मॉलमध्ये आलेले नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फुर्तपणे या उपक्रमात सहभाग नोंदविला. पनवेलमधील पालिका मुख्यालय, वडाळा तलाव, साई बाबा मंदिर, एमजीएम रूग्णालय कामोठे, चारही प्रभागातील डिमार्ट, बाजारपेठा, खारघरमधील लिटल वर्ल्ड मॉल,चौक, सोसायट्या अशा अनेक ठिकाणी नागरिकांनी अकरा वाजता उभारून राष्ट्रगीत गायले. तसेच स्वच्छता कर्मचार्यांनी घंटागाडी ज्या ज्या विभागात उभी आहे अशा 80 ठिकाणी नागरिकांना एकत्रित करून ‘समूह राष्ट्रगीत गायन’ उपक्रमामध्ये सहभाग घेतला. अशा पध्दतीने महापालिकेच्या माध्यमातून जवळपास 100 हून अधिक ठिकाणी ‘समूह राष्ट्रगीत गायन’ उपक्रम राबविण्यात आला. महापालिका क्षेत्रातील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, पदवी महाविद्यालये अशा सुमारे 250 शालेय संस्थाच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. तसेच खाजगी आस्थापना, शासकीय आस्थापना, विविध संस्थांची कार्यालये असे सर्व मिळून सुमारे 300 हून अधिक ठिकाणी महापालिका कार्यक्षेत्रात ‘समूह राष्ट्रगीत गायन’ उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांनी राष्ट्रभक्तीचे दर्शन घडविले.
खारघर : रामप्रहर वृत्त
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने बुधवारी (दि. 17)सकाळी 11.00 वाजता सामुदायिकरित्या राष्ट्र गायनाचे आयोजन करणेबाबत शासनाकडून आदेश प्राप्त झाले होते. त्यानुसार शहरातील नागरिकांमध्ये देशभक्ती वृध्दीगत होवून सद्भावना निर्माण होण्याचे दृष्टीने खारघर भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालय, बाजारपेठ, स्वच्छतादूत व विद्यार्थी यांच्यासोबत एक मिनिट जागेवर उभे राहून या अभियानात सहभाग घेतला.
खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, जिल्हा चिटणीस गीता चौधरी, उपाध्यक्ष दिलीप जाधव, नवनीत मारू, भरत कोंढाळकर, अशोक जंगीड, गिरीश गुप्ता, शैलेंद्र त्रिपाठी, चेतन कसबले, विजय बागडे व इतर कार्यकर्ते यांनी जनसंपर्क कार्यालयात तर माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी स्वच्छतादूत व रहिवाश्यांसोबत समूह राष्ट्रगीत गायन केले.
खारघर कायदा सेलचे संयोजक ऍड. राजेंद्र अग्रवाल यांनी त्यांच्या कार्यालयात गायनाचे आयोजन केले. खारघर मंडल सरचिटणीस दीपक शिंदे यांनी शालेय विद्यार्थी यांना राष्ट्रगीताची माहिती व व महत्व समजावून त्यांच्यासोबत एकत्रित गायन केले.
पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत स्वराज्य महोत्सव सप्ताहाची सांगता येथील रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेजच्या प्रांगणात समूह राष्ट्रगीत गायनाने उत्साहात झाली.
रयतच्या गव्हाण विद्यालय व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व टी. एन. घरत जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने गव्हाण विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी 11 वाजता विद्यार्थी आणि शिक्षकांनी समूह राष्ट्रगीत गायन करून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित विविध उपक्रमांची व स्वराज्य सप्ताहाची सांगता झाली.
या वेळी गव्हाण विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रणिता गोळे, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य रवींद्र भोईर, लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर, विद्यालयाचे पर्यवेक्षक दीपक भर्णुके, जुनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे, गव्हाण विद्यालयाचे क्रीडा शिक्षक जयराम ठाकूर, मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक नितीन म्हात्रे, कुर्हाडे व दोन्ही विद्यालयांचे सर्व शिक्षक, कर्मचारी व मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.