खालापूर : प्रतिनिधी
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव तत्पर असणारी खाकी वर्दी बुधवारी (दि. 17) प्रवाशांच्या सेवेसाठी चक्क रस्त्यावर उतरली होती. हातात दंडूक्याऐवजी घमेली आणि फावडे घेऊन खोपोली-खालापूर मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी खालापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचार्यांनी श्रमदान केले. खालापूर तालुक्यातील अतिशय दुरवस्था झालेला रस्ता म्हणजे जुना मुंबई-पुणे महामार्ग आहे. या महामार्गाच्या खालापूर ते खोपोली फाटा या सात किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम 2017मध्ये सुरू झाले होते. मात्र ठेकेदारान दर्जा न राखता हे काम कसेबसे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात त रस्त्याची प्रंचड दुरावस्था होते.सध्यादेखील या रस्त्याची प्रचंड दूरावस्था झाली असून छोटे-मोठे अपघात घडत आहेत. वास्तविक या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम एमएसआरडीसीचे आहे. गणेशोत्सव तोंडावर आल्यामुळे या मार्गावर वाहतुकीचा ताण अधिक जाणवू लागला असून, सणासुदीला विघ्न नको म्हणून या रस्त्याची दुरुस्ती करण्याकरिता चक्क खालापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी सरसावले आहेत. पोलीस निरीक्षक बाळा रघुनाथ कुंभार, हवालदार नितिन शेडगे, रमेश उघडा, महिला पोलीस नाईक सोनम शेळके, लतिका गुरव, पोलीस शिपाई समिर पवार आणि त्यांच्या सहकार्यांनी बुधवारी खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले. श्रमदान करून त्यांनी या रस्त्यावरील खड्डे बुजविले.