मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी
शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत पोलीस महासंचालकांना सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.
माजी आमदार विनायक मेटे यांच्या कारला 14 ऑगस्ट रोजी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा घातपात तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी अपघाताच्या त्या दोन तासांत काय झाले याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली होती. अशातच सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली जात आहे. या ऑडिओ क्लिपमधील आवाज विनायक मेटेंच्या अपघातापूर्वी त्यांच्यासोबत असलेले आणि त्यांचे निकटवर्तीय अण्णासाहेब मायकर यांचा असल्याचा दावा केला जात आहे.
दरम्यान, विनायक मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी मेटेंच्या वाहनचालकावर संशय घेत त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मेटे यांचा चालक सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. तो वेगवेगळा जबाब देतोय, असा आरोप चव्हाण यांनी केला आहे.
विनायक मेटे यांच्या अपघातानंतर मुख्यमंत्री शिंदे तातडीने पनवेलजवळील कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात गेले होते. त्या वेळीच प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या मृत्यची सखोल चौकशी करण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार बुधवारी (दि. 17) त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ याना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिले आहेत.