माणगाव : प्रतिनिधी
संत नामदेव हे पहिले राष्ट्रीय संत असून त्यांनी संपूर्ण देश जोडण्याचे काम केले. आपला पुनर्जन्मावर विश्वास नसून, या जन्माचे सोने करण्याचे काम प्रत्येकाने केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिध्द साहित्यीक माजी आमदार रामदास फुटाणे यांनी माणगाव तालुक्यातील तळाशेत येथे केले. भाजपचे तालुका अध्यक्ष आप्पा ढवळे यांनी आपल्या कमाईतून माणगाव तालुक्यातील तळाशेत येथे श्री विठ्ठल रखुमाई, संत नामदेव व दत्त मंदिर उभारले आहे. या मंदिराचा लोकार्पण सोहळा रायगड जिल्हा शिंपी समाज महासंघ व श्री संत नामदेव शिंपी समाज तळाशेत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी रामदास फुटाणे बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी संजयआप्पा ढवळे यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. संत नामदेव महाराजांनी समाज प्रबोधनासारखे चांगले कार्य केले. त्यांचा आदर्श नजरेसमोर ठेवून आपण सर्वांनी एकसंघ होऊन समाजाची उन्नती साधू या, असे आवाहन शिंपी समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम मुळे यांनी या वेळी केले. या कार्यक्रमात समाजातील गुणवंत विद्यार्थी व उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत बारटक्के यांनी केले. मंदिर देवस्थानचे अध्यक्ष मेघनाथ सातपुते, उपाध्यक्ष संजयआप्पा ढवळे, द्वारकानाथ ढवळे, तळाचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, भाजपच्या तालुका उपाध्यक्षा यशोधरा गोडबोले, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा अश्विनी महाडिक, तसेच चिन्मय मोने, अनिल नवगणे, दत्तात्रेय पांढरकामे, अरुण करंबे, अशोक सातपुते, राजेश मेहता, नितीन दसवते, प्रभाकर पतंगे, हेमंत बारटक्के, जयकिरण बारटक्के, श्रीकांत खटारे, लहू लुष्ठे, काका नवगणे, तुकाराम शेलार, बाबुराव चव्हाण आदींसह ढवळे कुटुंबीय, शिंपी समाजाचे पदाधिकारी व सदस्य, आणि पंचक्रोशीतील भाविक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेघना सातपुते यांनी आभार मानले.