Breaking News

‘शिवरायांची आग्र्याहून सुटका इतिहासातील सर्वांत रोमांचकारी घटना’

अलिबाग : प्रतिनिधी

देव, देशासाठी जीव ओवाळून टाकणारी पिढी घडविण्याची ताकद रायगड किल्ल्याच्या मातीत असून, त्या श्रध्देने प्रत्येकाने एकदा तरी किल्ल्यावर जावून तेथील माती आणून देवघरात ठेवावी, असे आवाहन शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी बुधवारी (दि. 17) रायगड जिल्हा परिषदेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान कार्यक्रमात केले. या वेळी देशमुख यांनी आग्रा दरबारातील प्रसंग कथन करीत सभागृहात रोमांच उभा केला. तसेच महाराजांची आग्र्याहून सुटका ही इतिहासातील सर्वात रोमांचकारी घटना असल्याचे मत व्यक्त केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रायगड जिल्हा परिषदेच्या ना. ना. पाटील सभागृहात बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानाचे आयोजन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. या वेळी शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्ध कौशल्य, अंधश्रध्देला न मानणारे शिवाजी महाराज, श्रध्देचा बळावर सरदार व मावळ्यांच्या मनात स्फूर्ती जागृत करणारे शिवाजी महाराज, कितीही मोठे संकट आले तरी न डगमगता संकटांचा सामना करणारे शिवाजी महाराज अशी शिवाजी महाराजांची अनेक व्यक्तीमत्वे सप्रमाण मांडली. याचबरोबर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य कथन केले. शिवाजी महाराजांची स्वराज्य निर्मिती व संभाजी महाराजांचे बलिदान यामुळेच औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीतच मूठमाती मिळाली, असे शिवव्याख्याते देशमुख सांगितले.  रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, कृषी विकास अधिकारी लक्ष्मण खुरकुटे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम, माध्यमिक शिक्षण विभाग अधिकारी ज्योत्स्ना शिंदे-पवार, प्राथमिक शिक्षण अधिकारी पूनिता गुरव, मुख्य लेखा, वित्त अधिकारी भगवान घाडगे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply