पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल शहर व ग्रामीण भागात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पावसाने हजेरी लावली तरीही गोविंदा पथकांचा उत्साह कायम राहिला. पनवेल लाईन अळी, कोळीवाडा, ग्रामीण भागातील काही ठिकाणी हंड्यांचे सर्वांचे आकर्षण होत्या.
दिवसभर रिमझिम पावसात गोविंदा पथक बोल बजरंग बली कि जय म्हणत दही हंड्या फोडण्यास हात सरसावत होते.
दहीहंड्या पाहण्यास आलेल्या नागरिकांचा उत्साह देखील ढोल ताशांचा गजर ऐकून द्विगुणीत झाला होता. विविध मंडळानी पारितोषिकांचे आयोजन करून हंडी स्पर्धांचे आयोजन केले होते. तर शहरातील पनवेल लाईन अळी, कोळीवाडा याठिकाणी पारंपारिक पद्धतीने दहीहंडी फोडून आनंद साजरा करण्यात आला.
पनवेल तालुक्यात ग्रामीण भागात पारंपारिक पद्धतीने दहीकाला उत्सव साजरा करण्यात आला. तालुक्यात अनेक गावात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भजन, कीर्तन आयोजन करण्यात आले होते. गावागावात यानिमित्ताने सर्वांनी एकत्रित येत पारंपारिक नृत्य करत दहीकाल्याचा आनंदोत्सव साजरा केला.