भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठे गुंतवणूकदार म्हणून राकेश झुनझुनवाला यांचे नाव घेतले जाते. अगदी छोटी सुरवात करून 45 हजार कोटी रुपयांची संपत्ती त्यांनी मिळविली होती. शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी भारतीय गुंतवणूकदारांना प्रेरणा देणार्या आणि भारताच्या विकासावर ज्यांचा प्रचंड विश्वास होता, अशा या ‘बिग बुल’ विषयी.
बिग बुल नावाने ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे वयाच्या 62 व्या वर्षी 14 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांची संपत्ती 5 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असूनही ते साधेपणाने रहात असत. एका इन्कम टॅक्स ऑफिसरचा मुलगा ते शेअर बाजारात अफाट यश प्राप्त करणारा अवलिया असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. चार्टर्ड अकाउंटंट झाल्यावर 1985 साली शेअर बाजारात त्यांनी कामाला सुरूवात केली होती. देशभरातील गुंतवणूकदार झुनझुनवाला यांनी कोठे गुंतवणूक केली यावर बारकाईने लक्ष ठेवून असत.
राकेश झुनझुनवाला यांनी टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून मोठा फायदा मिळवला होता. 2025 साली सामाजिक कार्यासाठी पैसे खर्च करण्याची त्यांची इच्छा होती. जेव्हा राकेश झुनझुनवाला यांना पैसे गुंतवायचे असत तेव्हा कंपन्या त्यांच्याकडे धाव घेत.
झुनझुनवाला यांची संपत्ती किती?
शेअर बाजारातून रेअर एन्टरप्राइजेस उद्योगाचे जाळे उभे केलेल्या झुनझुनवाला यांनी सुमारे 45 हजार कोटींची संपत्ती कमावली आहे. हजारो कोटींची संपत्ती असलेल्या झुनझुनवाला यांचा प्रवास फक्त 5,000 रुपयांपासून सुरू झाला होता. 1985 साली बाँबे स्टॉक एक्स्चेंजचा सेन्सेक्स 150 अंकांच्या जवळ होता. त्या वेळी लोकांना शेअर बाजार हा जुगार वाटत असायचा. पण नेहेमी अभ्यास करणार्या धाडसी निर्णय घेणार्या झुनझुनवाला यांनी शेअर बाजाराची नस अचूक पकडली होती. गुंतवणुकीचे पर्याय त्या काळात मर्यादित होते. बाजार नियंत्रित नसल्यामुळे गुंतवणूकदारांना पैसे गुंतवताना भीती वाटायची. त्या वेळी लोक बँक एफडीमध्येच पैसे गुंतवत असत. त्या काळामध्ये झुनझुनवाला यांनी हिंमत दाखवून मोठी गुंतवणूक केली होती.
टायटनच्या शेअरने बदलले आयुष्य
राकेश झुनझुनवाला यांनी टायटन कंपनीचा शेअर विकत घेतला तेव्हा त्याची किंमत 3 रुपये होती. झुनझुनवाला यांच्या आवडीचा हा शेअर होता. त्याची किंमत सध्याच्या घडीला जवळपास 2 हजार 472 रुपये आहे. त्यांच्याकडे टायटन कंपनीचे जवळपास 11,086 कोटी रुपयांचे शेअर्स होते. या कंपनीमध्ये झुनझुनवाला यांचा जवळपास 5.10 टक्के हिस्सा आहे.
बेअर ते बिगबूल पर्यंतचा प्रवास
1992 साली झालेल्या घोटाळ्यामध्ये अनेक जण रस्त्यावर आले होते. झुनझुनवाला यांचा या काळात कोणताही तोटा झाला नाही. उलट या वेळी त्यांनी शॉर्ट सेलिंगमधून कोट्यवधी रुपयांचा नफा कमावला. त्यांचे राधाकृष्ण दमाणी हे या व्यवसायात सहकारी होते.दमाणी यांनी हर्षद मेहता घोटाळ्यानंतर शेअर बाजारातून माघार घेतली आणि रिटेल व्यवसायाला सुरुवात केली. याच काळात झुनझुनवाला यांनी शेअर बाजारातच जास्तीत जास्त गुंतवणूक करून स्वतःचा जम बसवला.
या कंपन्यांमध्ये होती गुंतवणूक
राकेश झुनझुनवाला यांनी सर्वाधिक गुंतवणूक टायटन या कंपनीत केली होती. त्यांनी या कंपनीमध्ये 9 हजार 174 कोटी रुपये गुंतवले होते. 2017 साली शेअर बाजार जोमात असताना एकाच दिवसात त्यांनी या शेअर्समधून 900 कोटी रुपये कमावले होते. त्यांनी स्टार हेल्थ कंपनीत 5 हजार 372, मेट्रो ब्रॅण्ड कंपनीत 2 हजार 194 गुंतवले होते. टाटा उद्योग समूहाच्या टाटा मोटर्समध्ये 1 हजार 606 तर क्रिसिल कंपनीत 1 हजार 274 कोटी रुपये गुंतवले होते. राकेश झुनझुनवाला यांचे मुंबईतील महागड्या मलबार हिल भागामध्ये घराचे बांधकाम सुरु होते.
झुनझुनवालांच्या हालचालींवर लक्ष
शेअर मार्केटमध्ये राकेश झुनझुनवाला हे नाव कायम चर्चेत असायचे. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जायचे. बाजारामध्ये जेव्हा अस्थिरता निर्माण व्हायची तेव्हा गुंतवणूकदारांचे लाखो रुपये बुडत असत पण झुनझुनवाला यांच्या गुंतवणुकीवर होणारा परिणाम मर्यादित असायचा. आणि तोटा होत असला तरी ते निवांत असायचे.
भारतीय शेअर बाजाराचा सुवर्ण काळ अजून सुरू व्हायचा आहे असे त्यांचे नेहमीचे वाक्य असायचे. याला ते चेींहशी ेष रश्रश्र र्इीश्रश्र र्ठीपी असे म्हणायचे. भारताच्या प्रगतीवर त्यांचा प्रगाढ विश्वास होता. नेहमीच बाजारामध्ये आक्रमकता न दाखवता संयम ठेवायला हवा हे त्यांनी उदाहरणातून पटवून दिले. त्यांनी संयम आणि अभ्यास करून गुंतवणूक केल्यामुळे शेअर बाजारात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. लाखो भारतीयांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास ‘बिग बुल’ झुनझुनवाला यांनी प्रेरणा दिली.
-अभिजित कोळपकर, अर्थप्रहर
RamPrahar – The Panvel Daily Paper