Breaking News

मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

156 फेर्‍यांत होणार प्रक्रिया पूर्ण; आता प्रतीक्षा निकालाची

अलिबाग : जिमाका

रायगड लोकसभा मतदार संघाची मतमोजणी गुरुवारी (दि. 23) नेहुली अलिबाग येथील क्रीडा संकुलात होणार असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रत्येकी 14 टेबल्सवर मतमोजणी करण्यात येणार असून, लवकरात लवकर निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न असणार आहे, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.

नेहुली क्रीडा संकुल येथे सध्या कडक पोलीस बंदोबस्त असून, मतमोजणीच्या दिवशी अधिकृत प्राधिकार पत्र किंवा निवडणूक ओळखपत्र असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी, पर्यवेक्षक, मतमोजणी कर्मचारी या सर्वांना आयोगाच्या तसेच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे

प्रत्येक मत मोजणीसाठी 14 टेबल्स

रायगड लोकसभा मतदार संघातील 6 विधानसभा मतदार संघ निहाय होणार्‍या प्रत्येक मतमोजणीसाठी प्रत्येकी 14 टेबल असणार आहेत. त्यानुसार एकुण लोकसभा मतदार संघाच्या 156  फेर्‍या होणार आहेत. त्यात सर्वाधिक फेर्‍या 28 महाड आणि सर्वात कमी फेर्‍या 23 गुहागर या विधानसभा मतदार संघाच्या होणार आहेत.ायगड लोकसभा मतदारसंघातील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड, दापोली, गुहागर अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघामध्ये  एकुण 16,51,560 मतदारांपैकी 10,20,140 मतदारांनी मतदान केले आहे. एकुण 61.76 टक्के मतदान झालेले आहे.

अशी होणार मत मोजणी

23मे रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीस सुरूवात होणार असून, प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी 14 टेबल निहाय आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्व विधानसभा मतदार संघातील 84 टेबलनिहाय पहिल्या फेरीची मतमोजणी झाल्यानंतर, दुसरी फेरीची मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे. सर्व प्रथम ईटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम) मते बारकोडद्वारे मोजली जाणार आहेत. तसेच पोस्टल बॅलेटद्वारे प्राप्त झालेली मते मोजली जाणार आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघात ईटीपीबीएसचे 1405 मतदार व पोस्टल बॅलेटचे 9399 असे एकूण 10804 मतदार आहेत. त्यापैकी  आत्तापर्यंत अनुक्रमे 755 व 4805 अशी एकूण 5560 मते प्राप्त झालेली आहेत. सर्व प्रथम या मतपत्रिकांची मतमोजणी केली जाणार आहे. सर्व मतदारसंघाची टेबल व फेरी निहाय  मतमोजणी, पोस्टल बॅलेट व ईटीपीबीएस यांची मतमोजणी झाल्यानंतर निकाल घोषित केला जाणार आहे.

प्रशिक्षण वेगात

मतमोजणीसाठी आवश्यक अधिकारी, कर्मचारी यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. सदर मतमोजणी अधिकारी, कर्मचारी यांना 30 एप्रिल रोजी पहिले प्रशिक्षण देण्यात आले असून, शनिवारी (दि. 18) दुसरे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे  तसेच मतमोजणीची रंगीत तालीम 22 मे रोजी नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात घेण्यात येणार आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply