Breaking News

पुस्तक प्रकाशन, ग्रंथव्यवहार आणि तंत्रज्ञान

एक काळ होता की जेव्हा लेखकाचं पुस्तक छापलं जाणं हा परदेशगमनाच्या योगापेक्षाही अवघड योग होता. कितीही उत्तम लिखाण असो लेखकाला ’नाव’ नसेल तर प्रकाशक त्याला उभा करीत नसत. पुस्तक प्रकाशित करणे आणि वाचकांपर्यंत पोहचवणे ही त्या काळी प्रकाशकाची शंभर टक्के मक्तेदारी होती. एखादा नवोदित लेखक हस्तलिखित दाखवायला आला की प्रकाशक त्याकडे काहीशा गुर्मीतच पहात असे. लिखाण न वाचता पुस्तक नाकारणे ही त्या गुर्मीची पुढली पायरी असे. परिणामी खूप प्रयत्न करूनही प्रकाशक मिळाला नाही आणि म्हणून दुर्दैवाने पुस्तक निघू शकले नाही हा अनुभव उदयोन्मुख लेखकांच्या पाचवीला पुजलेला असे. अशा परिस्थितीत पुस्तक निघाले नाही, त्यामुळे ते लिखाण वाचकांपर्यंत पोचले नाही आणि  लिखाणाचे ते हस्तलिखित बाड लेखकाच्याच कपाटात पडून राहिले असे होई. असे असंख्य अनामिक गुणवंत लेखक गतकाळात आपापल्या कपाटात आपापले अप्रकाशित हस्तलिखित लिखाण सोडून हे जगही सोडून गेले, पण आता परिस्थिती बदलली आहे.

लेखकाला त्याचे पुस्तक सहजपणे आणि माफक खर्चात प्रकाशित करता येईल व मुख्य म्हणजे देशभरच्या कानाकोपर्‍यातल्या सर्व वाचकांपर्यंत ते पुस्तक विक्रीच्या माध्यमातून विनासायास पोहचवता येईल अशी स्थिती आज सुदैवाने दोन कारणांमुळे निर्माण झाली आहे. ती दोन्ही कारणे हा आजच्या प्रगत तंत्रज्ञानाचा भाग आहेत. ज्यांच्यावर प्रकाशक प्रसन्न व्हायला तयार नाही अशा आजच्या लेखकाने ही दोन्ही कारणे आणि त्या मागील तंत्र बारकाईने लक्षात घेणे नितांत आवश्यक आहे. आणि हो, हे काही मोठे रॉकेट सायन्सही नाही. त्या खरंतर चार दोन व्यावहारिक टीप्स किंवा फार तर ट्रीक्सच आहेत.

आजच्या पिढीतल्या अनेकांना, खरंतर त्या प्रगत तंत्रज्ञानाची कल्पना आहे, मात्र त्यातल्याही अनेकांना एका पुस्तकाच्या छपाईसाठी आज नेमका सरासरी खर्च किती येतो याची सुस्पष्ट कल्पना नसण्याची शक्यता आहे. त्याचे कारण स्वाभाविक आहे. पुस्तक तयार करून ते छापण्याचा प्रत्यक्ष अनुभव अनेकांना नसतो. जी असते ती वरवरची ऐकीव आणि बरेचदा अवास्तवाकडून नाउमेदीकडे नेणारी आजच्या संदर्भात कालबाह्य झालेली टरफली माहिती. या अवास्तव माहितीमुळेही आजचे कितीतरी सकस लेखन प्रकाशनापासून वंचित राहते.

या टप्प्यावर क्षणभर गृहित धरू की छपाईचे इथून तिथून काहीतरी जमवले आणि पुस्तक छापले. एकदाच्या त्या 500 प्रती हाती आल्या, पण प्रती आल्या म्हणजे काम झाले असा प्रकार नसतो. खरा चक्रव्यूह आणि आव्हान त्या पुढेच सुरू होतो. पुस्तकाच्या प्रतींचे छापून आलेले गठ्ठे समोर दिसत असतात. त्यातल्या पहिल्या पाच-पन्नास प्रती हौसेने ’सप्रेम भेट’ शब्दाखाली लेखकाची फर्राटेदार सही होऊन फुकट जातात. म्हणजे चकटफू वाटल्या जातात. बाकीच्या प्रतींचं काय करायचं? मोठाच प्रश्न असतो. मग पुस्तक वितरकाचा शोध सुरू होतो. त्या वितरकाने महाराष्ट्रभरच्या ग्रंथविक्रेत्यांना म्हणजे पुस्तकांच्या दुकानांना आपले पुस्तक विक्रीसाठी द्यावे अशी लेखकाची अपेक्षा असणे स्वाभाविक आहे, पण या संदर्भातील म्हणजे पुस्तक वितरण प्रक्रियेच्या संदर्भातील आजची 2022 सालातली परिस्थिती अतिशय दयनीय आहे. पुस्तक वितरक नावाचा प्राणी आज नामशेष झालेला आहे. वितरक का नामशेष झाला? कारण त्याची सतत शिकार होत राहिली. ती शिकार कोणी केली? ती शिकार पुस्तक विक्रेत्या दुकानदारांनी केली. वितरक प्रकाशक किंवा लेखकाकडून वितरणासाठी पुस्तकांच्या प्रती घेतो. त्या महाराष्ट्रभर वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या वा तालुक्यातल्या दुकानांकडे विक्रीसाठी देतो. दुकानाने 40 टक्के कमिशनने प्रती विकाव्या आणि वितरकाला विक्रीची रक्कम कमिशन कापून द्यावी अशी बोली असते. दुकानदाराने ’ऑन सेल पेमेंट’ द्यावे, वितरकाने दुकानदाराकडून वसुली करून प्रकाशक वा लेखकाच्या प्रतींचे पैसे द्यावेत असा व्यवहार असतो. प्रकाशक वा लेखक छपाईचे बिल देऊन पैसे गुंतवून व अडकवून बसलेला असतो. विक्री व्यवहार सगळा क्रेडिटवर आधारलेला असतो. पुढे हमखास असे होते की दुकानदार पुस्तकाच्या प्रती गिर्हाईकांना रोखीने विकतो, पण वितरकाचे पैसे रखडवतो. नंतर बहुतेकदा बुडवतो. या कारणाने वितरक प्रकाशक वा लेखकाला त्याचेकडून घेतलेल्या प्रतींचे पैसे देऊ शकत नाही. बरेचदा वितरकच बदमाषी करतो. दुकानदाराकडून पैसे वसूल करूनही मिळाले नाही सांगून गंडा घालतो. या कारणाने वितरक नामक प्राण्यावरचा विश्वास उडून तो आता ग्रंथव्यवहारातून नामशेष झाला आहे.

आता अशा परिस्थितीत प्रकाशक मंडळींना पुस्तक प्रदर्शनाचा आधार असतो. तिथे रोख विक्री होते. पैसे बुडत नाहीत, पण पुस्तक प्रदर्शनात नवोदित लेखकांची पुस्तके कोण विकत घेणार? तिथे विक्री होते ती पु. लं.सारख्या ख्यातनाम लेखकांच्या हॉट केक पुस्तकांची. म्हणजे नवलेखकांची पुस्तके प्रदर्शनात फार तर तो संबंधित लेखक स्वतःचे स्वत:च जे खरेदी करेल तेवढेच. त्यामुळे प्रदर्शनासाठी वाहतूक करून पुस्तके नेताना विक्रेता फक्त चलनी खपणारी पुस्तके गाठोड्यात बांधत असतो.

नवोदित लेखकाला स्वतःचे पुस्तक वाचकांपर्यंत पोहचवण्याचे वरदान देणारी ती दोन उपरोल्लेखित कारणे आणि तंत्र समजून घेण्यापूर्वी 2020 आणि 2021 या गेल्या दोन वर्षांत पारंपारिक ग्रंथविक्री व्यवहाराचे जे कंबरडे मोडले त्याकडे डोळसपणाने पाहिले पाहिजे. या काळात पुस्तकांची अनेक दुकाने बंद झाली. पुस्तक ही दुकानात जाऊन खरेदी करण्याची वस्तू राहिली नाही. पुस्तके आता ऑनलाइन खरेदी करण्याची वस्तू बनली आहे. पुस्तकांची दुकाने ही 2025च्या टप्प्यावर फक्त गतकाळातील आठवण म्हणूनच उरेल, असा अंदाज काही जण आज व्यक्त करताना दिसतात.

आता एवढं जाणून घेतल्यानंतर आपण त्या वरदानसदृश दोन कारणांकडे आणि तंत्राच्या भागाकडे वळू. पहिले तंत्र छपाईचे आहे. पूर्वीच्या तंत्रात पुस्तकाच्या किमान 500 प्रती छापाव्या लागत. त्यापेक्षा कमी प्रती छापायला प्रिंटर तयार होत नसे. मोठ्या मिनतवारीने त्याला तयार केला, तर तो छपाईचा दर इतका चढा सांगे की, सारे गणितच कोलमडून जाई. आपल्याकडे आजही पुस्तकाच्या प्रतींचा दर पृष्ठसंख्येशी निगडित असतो. म्हणजे 200 पानी पुस्तकाचा दर 200 रुपये व 500 पानी पुस्तकाचा दर 500 रुपये अशा किमती ठेवल्या जातात. दोनशे पानी पुस्तक चारशेला ठेवाल, तर गिहाईकाच्या चेहर्‍यावरील भाव असा दिसेल की जणू एक झेरॉक्स कॉपी मारण्याचा दर दहा रुपये सांगताहेत. त्या खेरीज पानाला रुपयापेक्षा अधिक दर ठेवला, तर पुस्तक विकत घेण्यापेक्षा पानांच्या झेरॉक्स मारणे लोकांना हुशारीचे आणि किफायतशीर असे दोन्ही वाटते.

आता यावर उपाय नव्या तंत्रज्ञानाने उपलब्ध केला आहे. ते तंत्र प्रिंट ऑन डिमांड या नावाने सर्वश्रुत आहे. यात अगदी दोन-पाच प्रतीही छापता येतात. अर्थात 50 किंवा 100 प्रती छापून घेता येतात. जर 200 पानी 300 प्रती छापल्या, तर एका प्रतीचा (छपाईचा) खर्च सामान्यत: 70 रुपये येतो. प्रिंटर नुसार तो 10-20 रुपये कमी-अधिक असू शकतो. यात पेजिनेशनचा म्हणजे पाने लावण्याचा खर्च अंतर्भूत नाही. पाने लावण्याचा खर्च अदमासे 40 ते 80 रुपयांदरम्यान असू शकतो. 40 रुपये दराने प्रोफेशनलने 200 पाने लावून दिली असे धरले, तर पेजिनेशनचे आठ हजार रुपये आणि छपाईचे 25 हजार असे एकूण 33 हजार होतात. यात आपल्याला 300 प्रती मिळतात. एका प्रतीची छपाई किंमत 110 रुपये होते.

या पीओडी तंत्राने पुस्तक छपाई करणारे आता मोठ्या शहरांमध्ये खूप प्रिंटर्स आहेत. आपण छपाईचे हे तंत्र पाहिले. ते आता बर्‍यापैकी रूळले आहे. आता पुस्तके छापून झाल्यानंतरचा म्हणजे वितरण व विक्रीचा भाग पाहू. वर स्पष्ट केल्याप्रमाणे पुस्तक दुकानांचा विक्रीसाठी शोध घेणे, संपर्क करणे, तिथे वाहतुकीने पुस्तके पाठवणे, विक्रीनंतर वसुली करणे हे सारे अक्षरशः अशक्यप्राय आहे. ते करण्यात वेळ व शक्ती घालवणे हा सुज्ञपणा नव्हे. त्या ऐवजी अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन माध्यमातून आपली पुस्तके भारतभरातील वाचकांसाठी उपलब्ध करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. अमेझॉनवर आपली पुस्तके  अधिकृत वितरकामार्फत विकणेच श्रेयस्कर असते. त्या अधिकृत विक्रेत्याला फक्त दहा प्रती विक्रीसाठी द्यायच्या असतात. त्यांची विक्री झाली आणि त्याचे पैसे मिळाले की पुढील दहा प्रती द्यायच्या अशी पद्धत असल्याने रिस्क फॅक्टर मर्यादित असतो. अगदी 250 रुपये छापील किमतीच्या दहा प्रती म्हणजे एकूण जोखीम फक्त 2500 रुपयांची. त्यातलेही 40 टक्के विक्रेत्याचे कमिशन वजा केले, तर निव्वळ जोखीम फक्त 1500 रुपयांची उरते. अशा तर्‍हेने लेखकाची पुस्तके सहजपणे सर्वत्र पोहचतात.

-विश्वनाथ खांदारे

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply