आमदार मंदा म्हात्रे यांना यश
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना आमदार मंदा म्हात्रे यांच्यामुळे दिलासा मिळाला आहे. स्थानिकांना अंधारात ठेऊन एकाच ठेकेदाराला दिलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाची कामे रद्द करण्यात आले होते. या कामांचे कंत्राट स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना देणेबाबत तसेच साफसफाईच्या 96 कामांचे देण्यात येणारे कंत्राटही जुन्या स्थानिक प्रकल्पग्रस्त कंत्राटदारांना देण्याबाबत बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली.
महापालिकेच्या उद्यान विभागाच्या कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार पाहता या ठेकेदाराची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांचे लायसन्स जप्त करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलण्याचे काम जर महापालिका प्रशासन करीत असेल तर यापुढे ते खपवून घेतले जाणार नाही. असा आक्रमक पवित्रा घेत आ. म्हात्रे यांनी महापालिका अधिकार्यांचा खरपूस समाचार घेतला. या वेळी न.मुं.म.पा. आयुक्त अभिजीत बांगर यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत ही दोन्ही कंत्राटे ही स्थानिक प्रकल्पग्रस्तांना देण्याबाबत प्रथम प्राधान्य असेल असे स्पष्ट केले. उद्यान विभागामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी समिती नेमली असून लवकरच सदरबाबत अहवाल सादर करणार असल्याचे सांगत दोषी कंत्राटदार व संबंधित अधिकार्यांवर कारवाई करण्याचे संकेतही आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले. यावेळी न.मुं.म.पाच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे व प्रशासन उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार उपस्थित होते.
नवी मुंबई महापालिकेला मिळालेले स्वच्छतेचे पुरस्कार हे प्रकल्पग्रस्तांमुळेच मिळालेले असूनही त्यांना नामशेष करण्याचा डाव महापालिका आखत आहे. परंतु हे कदापि सहन करणार नसून नवी मुंबईवर पहिला हक्क हा स्थानिक भूमीपुत्रांचा असल्याने जर त्यांना कामांमध्ये पुन्हा डावलण्यात आले तर यापुढे कोणाचीही हयगय केली जाणार नाही. आक्रमक पवित्रा घेत आंदोलन छेडले जाईल.
– आमदार मंदा म्हात्रे
RamPrahar – The Panvel Daily Paper