मुरूड तालुका बौद्ध समाज संघाकडून जंगी सत्कार
मुरूड : प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारच्या काळात फक्त राष्ट्रवादीलाच विकासनिधी मिळत होता. त्यामुळे आमच्या आमदारकीला धोका निर्माण झाला असता. त्या आघाडीत राहिलो असतो, तर आम्ही रायगडमधील शिवसेनेचे तिन्ही आमदार पुन्हा निवडून आले नसतो, असे प्रतिपादन शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी मुरूड येथे केले. मुरूड शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी आमदार दळवी यांनी निधी मिळवून दिला. त्याबद्दल मुरूड तालुका बौद्ध समाज संघाकडून आमदार दळवी यांचा शहरातील माळी समाज हॉलमध्ये सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते सत्काराला उत्तर देत होते. या स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. या शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहे, अशी ग्वाही आमदार दळवी यांनी या वेळी दिली. पालकमंत्री बदलावा यासाठी रायगडच्या तीन आमदारांनी मागणी केली होती. तेथूनच आघाडी सरकार बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या. हळूहळू शिंदे समर्थक आमदारांची संख्या 50वर गेली आहे. आमच्याकडे येणार्यांचा राबता सुरू आहे. अजूनही काही सत्य बाहेर यावयाचे आहे. हे सत्य उघड होईल तेव्हा संपूर्ण जनमत शिंदे गटाकडे येईल, असे आमदार दळवी यांनी या वेळी सांगितले. बौद्ध समाज संघाचे केंद्रीय समिती अध्यक्ष किशोर शिंदे, सरचिटणीस प्रदीप उमटेकर, स्मारक सचिव मंगेश येलवे, तालुका अध्यक्ष वसंत मोरे, आरपीआय तालुका अध्यक्ष बबन शिंदे, केंद्रीय समिती उपाध्यक्ष दीपक कांबळे यांच्या हस्ते आमदार महेंद्र दळवी यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. मुरूडमधील डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाचा विषय 45 वर्षे प्रलंबित होता, मात्र आमदार दळवी यांनी दोन वर्षांत स्मारक उभारणीसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला. बौद्ध समाज त्यांच्यामागे संपूर्ण ताकदीनिशी उभा राहील, किशोर शिंदे म्हणाले. पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. मुरूड नगर परिषदेचे प्रशासक पंकज भुसे, माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, नांदगाव ग्रामपंचायत माजी सरपंच भाई सुर्वे, तसेच भरत बेलोसे, ऋषिकांत डोंगरीकर, शुभांगी करडे आदीसह संपूर्ण तालुक्यातील बौध्द बांधव या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला गाफिल ठेवले होते. आघाडी सरकारने कार्यकाळ पूर्ण केला असता, तर शिवसेनेचे पाच आमदारदेखील निवडून आले नसतेे. आमच्या पक्षाला (शिंदे गटाला) मान्यता व चिन्हही मिळेल.
-महेंद्र दळवी, आमदार