Breaking News

रानगव्याच्या हल्ल्यात गुराखी जखमी

पोलादपुरातील कुडपण खुर्द येथील घटना

पोलादपुर : प्रतिनिधी

तालुक्यातील कुडपण खुर्द येथे शनिवारी (दि. 27) दुपारी रानगव्याने केलेल्या हल्ल्यात एक गुराखी गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी पोलादपूर, महाड, अलिबाग आणि आता मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये हलविले आहे. सचिन रघुनाथ शेलार असे रानगव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गुराख्याचे नाव आहे. तो शनिवारी कुडपण खुर्द परिसरातील जंगलात त्याची गुरे घेऊन गेला होता. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका रानगव्याने त्याच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सचिन शेलार गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने त्याला महाड आणि तेथून अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. अधिक उपचारासाठी त्याला मुंबईतील केईएम हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले. त्याच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच महाडचे वनक्षेत्रपाल साहु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपुरचे वनपाल श्याम गुजर, कोतवाल बुद्रुकचे प्रशांत गायकर, ढवळे येथील वनरक्षक दिलीप जंगम व उपसरपंच रवींद्र चिकणे, माजी सरपंच हनुमंत शेलार, ग्रामस्थ देवजी दाजी शेलार यांनी घटनास्थळी भेट दिली असता रानगव्याच्या चारही पायांच्या खुरांचे ठसे आढळून आले. त्यावरून रानगवा धिप्पाड आणि अजस्त्र असावा, असा कयास वर्तविण्यात आला आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply