धाटाव : प्रतिनिधी
कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पाच्या जागेत दुकानाचे गाळे बांधून त्यांची बेकायदेशीरपणे विक्री करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त होताच रोहा नगर परिषदेचे प्रशासकांनी सोमवारी (दि. 29) जागेवर जाऊन संबंधितांना अतिक्रमण हटविण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली. दरम्यान, नदीसंवर्धन प्रकल्पाच्या जागेचे विद्रुपीकरण थांबवावे, अशी मागणी सिटीझन फोरमने नगर परिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे. रोह्याच्या कुंडलिका नदीतीरी सुमारे 30 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करून नदीसंवर्धन प्रकल्पाचे काम करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या जागेमध्ये बेकायदेशीर कायमस्वरूपी दुकानाचे गाळे उभारण्यात येत होते. रोहा शहरात बेकायदेशीर गाळे उभे करून त्यांची 85 हजार रुपयांना विक्री केली जात असल्याची माहिती सोशल मीडियावर पसरताच नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागला. 23 ऑगस्टला रोहा नगर परिषदेच्या प्रशासकांना त्यासंबंधित पत्र पाठविण्यात आल्यानंतर सूत्रे हालली, शुक्रवारी नगर परिषदे तर्फे संबंधितांना दोन दिवसांची मुदत देणारी नोटीस देण्यात आली होती. सोमवारी सकाळी प्रशासक धीरज चव्हाण यांनी नगर परिषदेचे कर्मचारी, पोलीस आणि जेसीबी सोबत घेऊन प्रत्यक्ष जागेवर जाऊन कारवाई करण्याचे प्रयत्न केला. त्या वेळी संबंधितांनी सर्व बांधकामे दोन दिवसात हटविण्याचे कबूल केल्याने सदर कारवाई दोन दिवस स्थगिती ठेवण्यात आल्याचे प्रशासक चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, हे अतिक्रमण दूर करून नदी संवर्धन प्रकल्पाचे विद्रुपीकरण तातडीने थांबविण्यात यावे, अशी मागणी रोहा सिटीझन फोरमचे अध्यक्ष नितिन परब व निमंत्रक प्रदीप तथा आप्पा देशमुख यांनी नगर परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली.
अनधिकृत टपर्या हलवण्याबाबत संबंधितांना शुक्रवारी दोन दिवसांची मुदत देणारी नोटीस दिली होती. त्या अनुशंघाने सोमवारी कारवाई नियोजित होती, मात्र संबंधितांनी दोन दिवसात अतिक्रमणे हटविण्याचे कबूल केले आहे.
-धीरज चव्हाण, प्रशासक, रोहा नगर परिषद
RamPrahar – The Panvel Daily Paper