Breaking News

मनोरंजनाचे तांडव

केंद्र सरकार काही महत्त्वाची पावले टाकत असले तरी अजुनतरी ओटीटी व्यासपीठांना लगाम घालणारी व्यवस्था आपल्याकडे नाही हे मान्य करावे लागेल. अशाप्रकारची व्यवस्था निर्माण करणे हे दुधारी तलवारीसारखे आहे. ओटीटी कार्यक्रमांना सेन्सॉर बोर्डाचा अंकुश लावला तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थक चवताळून उठतात आणि या कार्यक्रमाच्या निर्मात्यांना मोकळे सोडले तर तांडव सारखा पेचप्रसंग निर्माण होतो. धरले तर चावते आणि सोडले तर पळते या म्हणीसारखी ही अवस्था आहे.

तांडव या वेबमालिकेवरून सध्या जे रान देशभर उठले आहे, ते पाहून कुठलाही सुजाण नागरिक विचारात पडल्याशिवाय राहणार नाही. राजकीय पार्श्वभूमीवरील कहाणी सांगणार्‍या या वेबमालिकेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जो काही नंगानाच दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी घातला आहे तो पाहून कुठल्याही सुसंस्कृत माणसाची मान शरमेने खाली जाईल. तांडव या वेबमालिकेच्या निर्मात्याने मुळात अशा प्रकारचा आशय असलेले काहीतरी मुळात निर्माणच का केले हा प्रश्न आहे. भारतासारख्या बहुविध संस्कृती नांदणार्‍या देशात अनेक प्रकारच्या प्रथा-परंपरा आणि श्रद्धास्थाने असतात व सामान्य नागरिक मनोभावे आपल्या मनातील पूजनीय प्रतिमा जपत असतात. अभिव्यक्तीच्या नावाखाली कुणी या प्रतिमांचा अपमान करणार असेल तर ते खपवून घेतले जात नाही हा आजवरचा अनुभव आहे. या संदर्भात भारतीय समाज असहिष्णू आहे, असा मात्र अर्थ कोणी काढू नये. जगभर बहुतेक सर्वच ठिकाणी विविध धर्मांचे समुदाय आपापली श्रद्धास्थाने जपून ठेवत असतात. त्यांच्यावर हल्ला झाला की त्या-त्या समाजाला तो आपल्यावरचाच हल्ला वाटतो. ही सामुहिक भावना असते. त्याला चूक किंवा बरोबर ठरवणे हेच मुळात अयोग्य. तांडव वेबमालिकेच्या संदर्भात नेमके हेच घडले. हल्लीच्या काळात इंटरनेटच्या माध्यमातून ओटीटी व्यासपीठांचे एक नवे माध्यम उपलब्ध झाले आहे. घरबसल्या टीव्हीवर किंवा हातातील मोबाइल फोनच्या छोट्या पडद्यावर हजारो चित्रपट, वेबमालिका आणि अन्य कार्यक्रम अहोरात्र बघण्याची सोय निर्माण झाली आहे. याला मनोरंजनाचा महापूर हे विशेषणदेखील तोकडे ठरावे. तुलनेने हे माध्यम नवे आहे त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणारी कुठलीही व्यवस्था अद्याप उभी राहिलेली नाही. ओटीटी व्यासपीठावरील कार्यक्रमांना कुठल्यातरी प्रकारे नियंत्रणात ठेवावे यासाठी नवे नियम-कायदे लागू करावेत, जमल्यास एखादे सेन्सॉर बोर्डच अस्तित्वात आणावे अशा प्रकारच्या मागण्या गेली काही वर्षे वारंवार होताना दिसतात. तांडव या वेबमालिकेत एका राजकीय परिवाराची काल्पनिक कहाणी दाखवताना नकळत काही जणांच्या धार्मिक भावना दुखावल्या. देवदेवतांची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष विटंबना झाली की अशी प्रतिक्रिया उमटणारच. परंतु तांडवच्या निर्मात्यांना हे भान राहिले नाही आणि गेल्याच आठवड्यात एका ओटीटी व्यासपीठावरून ही वेबमालिका प्रदर्शितही झाली. भारतीय जनता पक्षाने तांडवच्या निर्मात्यांच्या विरोधात प्रखर आंदोलन उभे केले. मुंबईसह महाराष्ट्रात काही ठिकाणी तसेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व राजस्थान आदी भागांत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. तांडवच्या दिग्दर्शक व निर्मात्यांनी त्याबद्दल सपशेल माफी मागितली आहे व आक्षेपार्ह भाग वगळण्याचेदेखील मान्य केले आहे. आता तरी हे प्रकरण संपायला हवे. यापुढील काळात कुठलाही आशय निर्माण करताना निर्माते आणि दिग्दर्शकांनी तारतम्य ठेवून आपापल्या कलाकृती पेश कराव्यात एवढीच अपेक्षा.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply