अलिबाग : प्रतिनिधी
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करीत लाडक्या गणपती बाप्पाला सर्वत्र भावपूर्ण निरोप देण्यात आला. या वेळी वरुणराजाने हजेरी लावली होती. तरीही गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे दिसून आले.
कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधानंतर यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सव जल्लोषात झाला. 10 दिवस गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. आनंद आणणारा, वातावरण प्रफुल्लित करणारा गणपती बाप्पा अखेर आपल्या गावी निघाला. या वेळी त्याची विसर्जन स्थळापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती. ढोल-ताशा, बँन्जोच्या तालावर तरुणाई थिरकत होती. अधूनमधून गणरायाचा जयजयकार सुरू होता. अखेर बाप्पाचे साजिरे रूप डोळ्यात साठवत त्याला निरोप देण्यात आला. या वेळी गणेशभक्त भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
23 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजाचे विसर्जन
मुंबई : येथील प्रसिद्ध गणपती लालबागचा राजाचे तब्बल 23 तास चाललेल्या मिरवणुकीनंतर गिरगाव चौपाटीवर विसर्जन झाले. या वेळी समुद्राचे पाणी अंगावर उडवत आणि बोटींच्या माध्यमातून लालबागच्या राजाला मानवंदना देण्यात आली. खास सजावट करण्यात आलेल्या तराफ्यावरून थाटामाटात मूर्ती समुद्रात रवाना झाली. त्यानंतर यांत्रिक तराफ्याच्या सहाय्याने या बाप्पाला खोल समुद्रात निरोप दिला गेला.
पुण्यात गणरायाचे विसर्जन करण्यास दुसरा दिवस उजाडला
पुणे : राज्यात नव्याने आलेल्या सरकारने यंदा विसर्जन मिरवणुकीवरीलही सर्व निर्बंध उठवल्यामुळे पुण्यात यंदाची मिरवणूक जोशात झाली. दुसर्या दिवशी म्हणजेच शनिवारी (दि. 10) दुपार झाली तरी गणेश विसर्जन मिरवणुका सुरूच होत्या. एकेक मंडळ दीर्घ काळ मार्गावर थांबून राहात असताना पोलिसांनी कोणत्याही स्वरूपाची जबरदस्ती केली नाही आणि कारवाईचा बडगाही उचलला नाही.
Check Also
स्व. भागुबाई चांगू ठाकूर यांच्या १३व्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मातोश्री स्व. …
RamPrahar – The Panvel Daily Paper