Breaking News

महाराष्ट्र महिला कबड्डी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी पेणचे संजय मोकल

पेण : प्रतिनिधी
गुजरातमधील अहमदाबाद येथे होणार्‍या 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र महिला कबड्डी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून रायगड जिल्ह्यातील पेणचे राष्ट्रीय खेळाडू संजय मोकल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
26 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन अहमदाबाद येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघ सहभागी होणार असून या संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी संजय मोकल यांच्याकडे देण्यात आली आहे.
संजय मोकल हे पेण तालुक्यातील कारावी गावचे रहिवासी असून त्याचा स्थानिक संघ नवतरुण कारावी, तर व्यावसायिक संघ महाराष्ट्र पोलीस हा होता. मोकल जे एक उत्कृष्ट चढाईपड्डू व उजवा कोपरारक्षक म्हणून आपली जबाबदारी चोख बजावत असत. त्यांनी अनेक मैदाने आपल्या चतुरस्त्र चढाईने व पकडीने गाजविली आहेत. याच जोरावर 1989मध्ये प्रथम त्यांना रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्यानंतर रायगड पोलीसमध्ये ते रूजू झाले आणि त्यांनी रायगडच्या कबडीचा चेहरामोहरा बदलला.
आपल्या नियुक्तीबद्दल बोलताना संजय मोकल यांनी सांगितले की, राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर 10 ते 23 सप्टेंबरदरम्यान पुणे बालेवाडी येथे सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरादरम्यान खेळांडूची प्रतिमा आणि प्लस-मायनस बाजू समजतील. त्यानुसार आपण रणनिती ठरवणार आहोत.
अहमदाबाद येथे होणार्‍या 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे महिला कबड्डीचे जेतेपद महाराष्ट्राकडे आणण्याचा पूर्ण विचार केला आहे. त्याप्रमाणे आपण 10 तारखेपासून तयारीला लागणार आहोत. माझ्यासोबत संघाच्या व्यवस्थापिका मेघाली कोरेगावकर आहेत. त्यांच्या अनुभवाचीदेखील मदत संघाला नक्कीच होईल, असेही मोकल म्हणाले.
रायगड जिल्हा भाताच्या कोठाराबरोबरच कबड्डीपटूंची खाण म्हणून ओळखला जातो. अनेक खेळाडू रायगडने राज्याला, देशाला दिले. त्यातीलच एक संजय मोकल यांची महाराष्ट्र महिला कबड्डी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली असून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply