Breaking News

माथेरानच्या मिनीट्रेनला पर्यटकांची पसंती

  • पाच महिन्यांत दीड लाख प्रवाशांनी केली सफर
  • मध्य रेल्वेच्या तिजोरीत एक कोटीहून अधिक उत्पन्न

मुंबई : प्रतिनिधी
पर्यटकांचे आकर्षण आणि स्थानिकांसाठी दळणवळणाचे साधन असलेल्या माथेरानच्या मिनीट्रेनमधून एप्रिल ते ऑगस्ट 2022 या पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल दीड लाखाहून अधिक पर्यटकांनी सफर केली असून मध्य रेल्वेला सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे.
थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानला बहुसंख्य पर्यटक भेट देत असतात. आटोक्यात आलेला कोरोना संसर्ग आणि लागून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येने पर्यटकांनी माथेरानला जाणे पसंत केले. निसर्गसौंदयाचे दर्शन घडवत डोंगरमाथ्यापर्यंत धावणारी माथेरानची मिनीट्रेन अबालवृद्धांना आकर्षित करीत आली आहे. गेल्या पाच महिन्यांत तब्बल एक लाख 54 हजारांहून अधिक पर्यटकांनी या मिनी ट्रेनमधून सफर केली. त्यामुळे मध्य रेल्वेला एक कोटी 12 लाख रुपये महसूल मिळाला. त्याचबरोबर एप्रिल-ऑगस्ट या कालावधीत 12 हजार 74 पार्सलची वाहतुकही करण्यात आली.
सध्या मिनीट्रेनची माथेरान ते अमन लॉज अशी शटल सेवा सुरू आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यानंतर नेरळ ते अमन लॉज मार्गावर 20 किलोमीटरपर्यंत नवीन रूळांचे काम हाती घेण्यात आले असून अपघात होऊ नये यासाठी रूळाच्या बाजूला उपाययोजनाही करण्यात येत आहेत. ही कामे पूर्ण करून नेरळ-माथेरानदरम्यानच्या संपूर्ण मार्गावर येत्या डिसेंबरपासून मिनीट्रेन सेवा सुरू करण्याचा मानस आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply