अदाड येथील सामाजिक सभागृहाचे लोकार्पण; आमदार महेंद्र दळवी यांचे विरोधकांवर टिकास्त्र
मुरूड : प्रतिनिधी
रायगडच्या माजी पालकमंत्र्यांनी फक्त त्यांच्याच मतदारसंघात निधी नेला व कामे केली. आगामी काळात अलिबाग व मुरूड तालुक्यातील 70 टक्के शेकाप खाली होणार आहे. ज्या पक्षांनी लोकांची मते घेऊन फसवणूक केली ते पक्ष आगामी काळात दिसणार नाहीत, असे प्रतिपादन आमदार महेंद्र दळवी यांनी मुरूड तालुक्यातील अदाड येथे केले. अदाड येथे उभारण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मुरूड तालुक्यातील 24 ग्रामपंचायती दत्तक घेत असल्याचे या वेळी आमदार दळवी यांनी जाहीर केले.आगामी काळात होणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुका शिंदे गट भाजपला सोबत घेऊन लढविणार आहे. या पुढे विरोधकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे आमदार महेंद्र दळवी यांनी या वेळी सांगितले. मुरूड शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून 55 कोटी रुपये देण्यात आले असून ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांसाठी शंभर कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही कामेसुद्धा लवकरच सुरु होणार आहेत, असे सांगून आमदार दळवी यांनी, अदाड गावातील सर्व विकासकामे पूर्ण करण्याचे आश्वासन या वेळी दिले. मागच्या आमदारांनी लोकांना दिलेले शब्द पूर्ण केले नाहीत मात्र आमदार महेंद्र दळवी यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्यामुळेच अदाड गावात भव्यदिव्य समाज मंदिर पहावयास मिळत आहे, असे भाजप नेते अॅड. महेश मोहिते यांनी सांगितले. या वेळी आमदार महेंद्र दळवी यांच्या काम करण्याच्या शैलीने प्रभावित होऊन अदाड, बेलीवाडी व वडघर येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मानसी दळवी, शिंदे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी, तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, जिल्हा संघटिका शुभांगी करडे, संघटक दिनेश मिणमिने, सरपंच हरिचंद्र भेकरे, माजी सरपंच भाई सुर्वे, अदाड शाखा प्रमुख नितेश पाटील, उपशाखा प्रमुख गजानन पाटील, निलेश घाटवळ, सुनील दिवेकर, भरत बेलोसे, यशवंत पाटील, संदीप पाटील यांच्यासह अदाड परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.