Breaking News

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त
नव्या शैक्षणिक वर्षातील शाळेचा पहिला दिवस गुरुवारी (दि. 15) सर्वत्र शाळा प्रवेशोत्सव म्हणून साजरा झाला. यानिमित्ताने पनवेल महापालिकेच्या 10 शाळांमध्ये पहिल्या दिवशी पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, चॉकलेट देऊन व औक्षण करून ढोल ताशाच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी धाकटा खांदा येथील शाळेत आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभली.
शाळेच्या पहिल्या दिवशी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची लेझिम, ढोल ताशाच्या गजरात त्या त्या विभागात रॅली काढण्यात आली होती. लोकनेते दि. बा. पाटील शाळेत शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी किर्ती महाजन यांनी पाठ्यपुस्तक, पुष्प व चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले तसेच इतर नऊ शाळांमध्ये मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. सर्व विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी खास सेल्फी पाँईट तयार करण्यात आला. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी, पालकांनी सेल्फी काढल्या.
धाकटा खांदा येथील शाळेत आमदार प्रशांत ठाकूर व माजी नगरसेवक मनेाहर म्हात्रे यांनी सदिच्छा भेट दिली. मुख्याध्यापक सुमन हिलम यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शाळेची पटसंख्या, पुस्तक वाटप या विषयी माहिती घेतली.
या वर्षी लोकनेते दि. बा. पाटील शाळेमध्ये महापालिकेच्या इंग्लिश मीडियम सिनिअर केजीचा वर्ग सुरू करण्यात आला आहे. मागील वर्षापासून महापालिकेने ज्युनिअर केजीचा वर्ग सुरू करून इंग्लिश मीडियम शाळा सुरू केली होती. या शाळेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या शाळेच्या विद्यार्थ्यांचेदेखील औक्षण करून गुलाबपुष्प, चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply