Breaking News

फिफा वर्ल्डकपसाठी नवी मुंबई पालिका सज्ज

नवी मुंबई : बातमीदार
जगातील सर्वांत लोकप्रिय क्रीडा प्रकार असणार्‍या फुटबॉलची 17 वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक स्पर्धा भारतात होत असून नवी मुंबईला यजमान शहराचा बहुमान लाभलेला आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हे सामने पाहण्याकरिता जगभरातून येणार्‍या फुटबॉल खेळाडूंच्या व क्रीडारसिकांच्या स्वागतासाठी नवी मुंबई शहर सज्ज असल्याचे सांगत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या अनुषंगाने कोणतीही कमतरता राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश प्राधिकरणांना दिले.
11 ते 30 ऑक्टोबर भारतामध्ये होत असलेल्या 17 वर्षांखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील महत्त्वाचे पाच सामने नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये 12, 15, 18, 21 व 30 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. या अनुषंगाने यजमान शहर म्हणून करावयाच्या तयारीचा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सविस्तर आढावा घेतला.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई, वाहतूक पोलीस उपायुक्त  पुरुषोत्तम कराड, क्रीडा विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे व इतर विभागप्रमुख आणि संबंधित अधिकारी त्याचप्रमाणे फिफाच्या पदाधिकारी रोमा खन्ना, मनदीप सहरन, अर्पिता नाखवा, श्रुती दागा, उमाशंकर कनोजिया तसेच डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम व्यवस्थापनाचे संचालक वृंदन जाधव आणि संबंधित महापालिका, पोलीस अधिकारी व फुटबॉल फेडरेशनचे अधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक दिवशी दोन सामने या प्रमाणे पाच दिवस डॉ. डि. वाय. पाटील स्टेडियम येथे सामने होणार असून विशेष म्हणजे या स्पर्धेचा अंतिम सामना 30 ऑक्टोबर रोजी याच स्टेडियममध्ये होणार आहे. या जागतिक स्पर्धेमध्ये अमेरिका, मोरोक्को, ब्राझिल, जर्मनी, नायजेरिया, चिली, न्युझिलंड, स्पेन, कोलंबिया, मेक्सिको, चीन, जपान, टान्झानिया, कॅनडा, फ्रान्स आणि यजमान भारत अशा 16 देशांचे संघ सहभागी होणार आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply