रसायनी : प्रतिनिधी
डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रसायनीत शासकीय कार्यालय परिसर व दांड-रसायनी रस्त्याच्या स्वच्छता मोहिमेचे आयोजन रविवारी (दि. 12) सकाळी 7 वाजल्यापासून करण्यात आले होते. या स्वच्छता मोहिमेत श्रीसदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील शासकीय कार्यालये व दांड-रसायनी रस्त्याची सफाई झाल्याने रस्ता चकाचक दिसत होता. राज्यपालांनी स्वच्छतादूत म्हणून नियुक्त केलेले डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रसायनी परिसरातील वावेघर, मोहोपाडा, रिस आदी थांब्यांवर सकाळी 7 वाजल्यापासून श्रीसदस्य हातात झाडू, घमेले, फावडे, लोखंडी पंजा, गवत कापण्याचे यंत्र घेवून जमले. यानंतर परिसरातील रसायनी पोलीस स्टेशन, पराडे वनविभाग कार्यालय, रसायनी पोस्ट ऑफिस, वासांबे मोहोपाडा तलाठी कार्यालय, रसायनी पोस्ट ऑफिस, मोहोपाडा पोस्ट ऑफिस, मोहोपाडा आरोग्य केंद्र या शासकीय कार्यालयांच्या आवारात साचलेल्या कचर्याची सफाई करून टाकाऊ कचरा एकत्र साठवून टेम्पोद्वारे काही अंतरावर नेऊन योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. यानंतर दांड-रसायनी रस्त्याच्या साईडपट्टीची झाडूने स्वच्छता करून दांड-रसायनी रस्ता चकाचक करण्यात आला.