Breaking News

स्वदेशी तंत्रज्ञान क्रांती

फाईव्ह जी इंटरनेट सेवेच्या शुभारंभाने भारताच्या आगामी वाटचालीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. या तंत्रज्ञानाचा फायदा केवळ दूरसंचारच नव्हे; तर शिक्षण, आरोग्य, कृषी यांसारख्या क्षेत्रांनाही होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5जी सेवेचा शुभारंभ करण्यात आला असून हळूहळू या सेवेचे जाळे देशभर विस्तारणार आहे.

आगामी काळ हा तंत्रज्ञानाचा असणार आहे. तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनात आधीच खूप प्रगती झाली असून येत्या कालावधीतही तंत्रज्ञान परिवर्तन घडवून आणणार आहे. या पार्श्वभूमीवर भारताने 5जी सेवेचा शुभारंभ करून नवा इतिहास रचला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरात 5जीची चर्चा सुरू होती. केंद्रीय दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशात लवकरच ही सेवा सुरू होणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावर शनिवारी झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी पंतप्रधानांनी 5जी सेवेचे महत्त्व अधोरेखित केले. त्याचप्रमाणे नवभारताच्या वाटचालीचा आढावा घेतला. 2जी, 3जी, 4जीच्या काळात भारत तंत्रज्ञानासाठी इतर देशांवर अवलंबून होता, पण 5जी ही स्वदेशी बनावटीची प्रणाली आहे. त्यामुळे 21व्या शतकातील भारतासाठी 1 ऑक्टोबर 2022 हा ऐतिहासिक दिवस आहे, ज्याची नोंद इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांत होईल. या नव्या स्वदेशी यंत्रणेमुळे नव्या युगाची पहाट झाली आहे, असे पंतप्रधान या वेळी म्हणाले. त्यांनी पुढे बोलताना आज 130 कोटी भारतीयांना 5जीच्या रूपाने एक अद्भूत भेट मिळत आहे. ही अनेक संधींची सुरुवात आहे, असे सांगून यासाठी देशवासीयांचे अभिनंदन केले. याअगोदर देशाला बाहेरून मोबाइल आयात करावे लागत होते, पण आता देश मोबाइल निर्यात करीत आहे. मोबाइल निर्मिती करण्यात भारत जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे. आत्मनिर्भर भारताने हे करून दाखवले आहे, याकडे पंतप्रधान मोदींनी लक्ष वेधले. ते जे म्हणाले ते खरेच आहे. आपला देश पूर्वी अनेक गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून होता. त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात विविध गोष्टींची निरनिराळ्या देशांमधून आयात करावी लागत होती. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून चित्र बदलले. त्यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा करून शेती, उद्योग, व्यवसायांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे अनेक उत्पादनांची भारतात निर्मिती होऊ लागली. अगदी काही दिवसांपूर्वी आयएनएस विक्रांत या युद्धनौकेचीही भारतात निर्मिती होऊन तिचे जलावरण करण्यात आले. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदींनी व्होकल फॉर लोकलचा नारा देत स्थानिक वस्तू, उत्पादने खरेदी करण्याची साद घातली. त्यास नागरिकही प्रतिसाद देत आहेत. एकूणच आपला देश आता प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण होत आहे.  अशातच 5जी सेवेमुळे विकासाचा वेग वाढणार आहे. सुरुवातीला ही सेवा देशातील प्रमुख 13 शहरांमध्ये दिवाळीपर्यंत उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये आपल्या राज्यातील मुंबई, पुणे या दोन शहरांचा समावेश आहे. सध्या रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या दोन कंपन्या ही सेवा देणार आहेत. काम करताना विनाअडथळा व वेगवान सेवेमुळे वेळ आणि पैशाचीही आपसूक बचत होणार आहे. 5जी या स्वदेशी डिजिटल सेवेमुळे तंत्रज्ञान देशात क्रांती घडणार आहे आणि या क्रांतीचे आपण सर्व देशवासी साक्षीदार असणार आहोत.

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply