Breaking News

ई-रिक्षाच्या समर्थनार्थ माथेरान नगर परिषदेवर मोर्चा

माथेरान : प्रतिनिधी
माथेरानमध्ये लवकरात लवकर पर्यावरणपूरक ई-रिक्षाची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात यावी आणि शालेय विद्यार्थी, अपंग, ज्येष्ठ तसेच पर्यटकांसाठी स्वस्त व सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टिकोनातून ही व्यवस्था सुरू व्हावी यासाठी सोमवारी (दि. 3) येथील नागरिक एकवटले होते. सर्वपक्षीयांनी त्यास पाठिंबा देत आपला सहभाग नोंदविला.
सर्वोच्च न्यायालयाने माथेरानमध्ये पर्यावरणपूरक ई-रिक्षाची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात यावी असे निर्देश दिलेले आहेत, पण अद्यापही प्रशासकीय पातळीवर ई-रिक्षाच्या चाचणीला गती मिळत नसल्यामुळे व्यापारी मंडळामार्फत ई-रिक्षाच्या समर्थनार्थ तसेच मुख्य रस्त्याचे अपूर्णावस्थेत असलेले काम लवकर पूर्ण करावे यासाठी नगर परिषदेवर मोर्चा काढला होता. त्यास समस्त व्यापारीवर्गाने शंभर टक्के आपली दुकाने बंद ठेवून पाठिंबा दिला. समाजाच्या सर्व स्तरांतून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
मोर्चात सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह जेष्ठ नागरिक संस्था, दिव्यांग सेवा संघटना, धोबी समाज, रेल्वे स्टेशन हमाल संघटना, गुजराती समाज, स्थानिक लॉजिंग चालक मालक संघटना, रग्बी विभाग, कुशल कामगार संघटना, अखिल भारतीय सफाई मजदूर संघटना, वन ट्री हिल पॉईंट विभाग, युवा रुखी गुजराती समाज, भारतीय बौद्ध महासभा, श्रमिक रिक्षा संघटना यांचे प्रतिनिधी आणि नागरिकांनी सहभाग घेतला होता. जवळपास सातशे जण उपस्थित होते. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.
‘15 तारखेपूर्वी कार्यवाही होणार’
या वेळी नगर परिषदेच्या सभागृहात प्रशासक सुरेखा भणगे यांना व्यापारी मंडळींनी ई-रिक्षाची चाचणी लवकरात लवकर घेण्यात यावी आणि अपूर्ण रस्त्याच्या कामांना गती मिळावी या मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यावर भणगे यांनी आम्ही येत्या 15 तारखेपूर्वी ई-रिक्षाची तीन महिन्यांसाठी पायलट प्रोजेक्टवर चाचणी घेणार आहोत आणि रस्त्याची जी कामे अपूर्ण आहेत ती पूर्ण केली जातील, असे आश्वासन दिले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply