मुंबई : प्रतिनिधी
मुंबई इंडियन्सचा संघ चौथ्यांदा इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल जेतेपदाचा चषक उंचावण्यासाठी सज्ज झाला आहे. तीन वेळा विजेतेपद पटकावणार्या मुंबईने 2018मध्ये समाधानकारक कामगिरी केली आणि 2019साठीच्या लिलावात त्यांनी अगदी अखेरच्या क्षणाला युवराज सिंग व लसिथ मलिंगाला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. मलिंगाने यापूर्वीही मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले आहे, परंतु युवराज प्रथमच मुंबईकडून खेळणार आहे. युवराजला मुंबईने ताफ्यात दाखल करून चाहत्यांची मने जिंकली. युवराजनेही आयपीएलपूर्वीच्या सराव सत्रात सहभाग घेत जोरदार फटकेबाजी केली. मुंबई इंडियन्सनेही खास शैलीत युवीचे स्वागत केले.
मुंबई इंडियन्ससह त्यांच्या चाहत्यांनाही युवराजकडून बर्याच अपेक्षा आहेत. त्यामुळे युवराजचे प्रमोशन करण्यात मुंबई इंडियन्स कोणतीच कसर सोडत नाही. त्यांनी युवराजच्या नावाने अनेक जाहिरातीही सुरू केल्या आहेत. मुंबईच्या सराव सत्रात युवीनेही नेट्समध्ये कसून सराव केला. त्याच्या या सरावाचा व्हिडीओ मुंबईने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि तो चांगलाच व्हायरल होत आहे.
’और फिर आए युवराज सिंग… धागा खोल दिये,’ असा मेसेज मुंबईने युवीच्या व्हिडीओखाली पोस्ट केला आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या आत्मचरित्रावर आधारित चित्रपटातील हा प्रसिद्ध डायलॉग आहे. जेव्हा युवी आणि धोनी यांची पहिली भेट होते आणि पंजाबचे प्रतिनिधित्व करणारा युवी माहीच्या झारखंड संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करतो, तेव्हा हा डायलॉग येतो.