Breaking News

फणसाड अभयारण्यात वन्यजीव सप्ताह उत्साहात

मुरूड : प्रतिनिधी

तालुक्यातील फणसाड अभयारण्यात 1 ते 7 ऑक्टोंबरदरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो. या अभयारण्यातील सुपेगाव पर्यटन संकुलात वन्यजीव सप्ताह 2022चा शुभारंभ करण्यात आला. या वेळी वन्यजीव संरक्षण तसेच फणसाड जैवविविधतेबाबत वन कर्मचारी आणि महिला बचत गटांना मार्गदर्शन करण्यात आले.  फणसाड अभयारण्यालगतच्या सातीर्डे गावात वन्यजीव विभाग, ग्रीन वर्क ट्रस्ट आणि अंशु फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. या वेळी गावातील प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, महिलांना वन्यप्राण्याबाबत छायाचित्रांद्वारे मार्गदर्शन करून वन्यप्राणी संवर्धनबाबत जनजागृती करण्यात आली. वन्यजीव सप्ताह निमित्ताने यशवंतनगर नांदगाव येथील श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांची जंगल सफर या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. कला शिक्षक अमर दरणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या चित्रकला स्पर्धेत इयत्ता पाचवी ते आठवीच्या गटात शुभ्रा संतोष जमनू हिने प्रथम क्रमांक, कस्तुरी जितेंद्र दिवेकर हिने द्वितीय आणि अन्वी निलेश बिरवाडकर हिने तृतीय क्रमांक मिळविला. तर इयत्ता आठवीच्या गटात  सिद्धी विनायक शेडगे, भक्ती बाळासाहेब फत्तेपुरे आणि ओम जनार्दन पाटील यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले. वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार काळभोर, काशीद वनपाल एस. एल. शिंदे, सुपेगाव वनपाल एस. व्ही. तांडेल, नांदगाव वनपाल ए. पी. पाटील, ग्रीन वर्क ट्रस्टचे संस्थापक निखिल भोपळे व त्यांचे सहकारी, अंशू फाउंडेशनचे निलेश गुंड व त्यांचे सहकारी या वेळी  उपस्थित होते.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply