माणगाव : प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टेमपाले गावच्या हद्दीत रविवारी (दि. 12) सकाळी वॅगनर कारने टेम्पोला समोरासमोर ठोकर दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, चारजण जखमी झाले आहेत.
चालक अखिलेश मंगेश बोंबाडे (वय 22, रा. रत्नागिरी) हा त्याच्या ताब्यातील टाटा एस कंपनीचा टेम्पो (एमएच 08, एपी 1748) या गाडीत आंब्याच्या पेट्या घेऊन रत्नागिरी येथून मुंबईकडे जात होता. त्याचा टेम्पो माणगावजवळील टेमपाले गावच्या हद्दीत आला असता, समोरून आलेल्या वॅगनर कार (एमएच 05, बीएल 5040) चालकाने टेम्पोला जोरदार ठोकर दिली. या अपघातात दर्शन गोपाळ पावले (वय 31, रा. डोंबिवली वेस्ट) यांचा मृत्यू झाला. तर संदिप कमलाकर पडवळ (वय 32, रा. वाशींद, जि. ठाणे), वैभव चंद्रकांत मोरे (वय 31, रा. कल्याण विठठलवाडी) टेम्पो चालक अखिलेश मंगेश बोंबाडे (वय 22) आणि चिन्मय शरद खरकुले (वय 24, रा. रत्नागिरी) हे चार जण जखमी झाले. त्यांना माणगाव उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक एस. पी. कुराडे करीत आहेत.