Breaking News

अलिबागच्या आरसीएफ प्रकल्पात स्फोट; तीन जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

अलिबाग : प्रतिनिधी
राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टीलायझर्स् लिमिटेड (आरसीएफ) कंपनीच्या अलिबागजवळील थळ-वायशेत येथील प्रकल्पात स्टीम जनरेशन प्लांटमध्ये भीषण स्फोट होऊन तीन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नवी मुंबईतील ऐरोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दुर्घटना बुधवारी (दि. 19) सायंकाळी 5च्या सुमारास घडली.
थळ येथील आरसीएफ प्रकल्पातील स्टीम जनरेशन प्लांटमध्ये नवीन वातानुकूलित यंत्रणा बसविण्याचे काम सुरू होते. ऍरिस्टो ट्रोटल नामक कंपनीला ही यंत्रणा बदलण्याचे काम देण्यात आले होते. कंपनीमार्फत वातानुकूलन यंत्रणा बसविताना संध्याकाळी पाचच्या सुमारास मोठा स्फोट झाला. यात तीन जणांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना आरसीएफ कंपनीच्या कुरूळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना नवी मुंबईतील ऐरोली येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
स्फोटाचा आवाज हा इतका मोठा होता की तो आजूबाजूच्या गावांतही ऐकायला आला. स्फोटानंतर आरसीएफ अग्निशमन यंत्रणा, पोलीस दल, सीआयआरएफ पथक घटनास्थळी दाखल झाले. स्फोटाबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Check Also

पेणमध्ये भाजपचा बूथ मेळावा उत्साहात

पेण ः रामप्रहर वृत्त रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.14) पेण तालुक्यात भाजपच्या बूथ मेळाव्याचे …

Leave a Reply