मुरूडमध्ये आनंदाचा शिधा वाटपातील अडथळा दूर
मुरूड : प्रतिनिधी
राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारकडून मिळाणार्या आनंदाचा शिधा वाटपाला मुरूड शहरात सुरूवात झाली आहे. श्री स्वामी समर्थ रास्तभाव धान्य दुकानात सचिन कासेकर यांच्या हस्ते लाभार्थींना आनंदाचा शिधा संचाचे वाटप करण्यात आले. या वेळी लाभार्थ्यांनी दुकानात गर्दी केली होती.
दिवाळी सणानिमित्त राज्य शासनाने नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येक शिधापत्रिकाधारकास एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लीटर पामतेल या चार शिधाजिन्नसांचा समावेश असलेला ‘आनंदाचा शिधा‘ संच 100 रुपयांमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. आनंदाचा शिधा ऑनलाइन पद्धतीने म्हणजेच पॉसमशीनच्या माध्यमातून वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मुरूड तालुक्यात पॉससर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने आनंदाचा शिधा वाटपाला उशीर होत होता. त्यामुळे ग्राहकांपर्यंत आनंदाचा शिधा संच पोहचू शकला नव्हता. आता आनंदाचा शिधा ऑफलाइन पध्दतीने वाटत करायला सुरुवात करण्यात आली आहे. मुरूड शहरात आनंदाचा शिधा संच वाटपास सुरुवात झाली आहे.