Breaking News

वनमंत्री संजय राठोड ठरले कोरोनाचे सुपर स्प्रेडर?

शक्तिप्रदर्शनानंतर महंतांसह 19 जण बाधित

वाशिम ः प्रतिनिधी
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे वादात सापडलेले वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे केलेल्या शक्तिप्रदर्शनाचे परिणाम आता दिसू लागलेत. राठोड यांच्या शक्तिप्रदर्शनानंतर सेवालाल ट्रस्टचे अध्यक्ष महंत कबीरदास यांच्यासह गावातील 19 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. राठोड यांच्या शक्तिप्रदर्शनाच्या काही दिवसांनंतर लगेच गावातील कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने राठोडच सुपर स्प्रेडर ठरलेत का, अशी चर्चा सुरू आहे.
पूजाच्या मृत्यूप्रकरणी आरोपांनंतर 15 दिवसांनी वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे जनतेसमोर शक्तिप्रदर्शन केले. प. विदर्भात कोविडचा उद्रेक असतानाही वनमंत्र्यांनी बेजबाबदारपणे केलेले शक्तिप्रदर्शन कोरोना वाढीला हातभार लावणारे ठरल्याचे दिसते.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी गर्दी करू नये व कुठलाही कार्यक्रम न घेण्याचे जाहीर आवाहन केले होते, मात्र त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली. या प्रकरणी जोरदार टीका झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. वाशिम पोलिसांनी 10 जणांसह या ठिकाणी उपस्थित असलेल्या आठ ते दहा हजार लोकांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये मंत्र्यांचा समावेश नाही.

Check Also

नवी मुंबई विमानतळाला ‌‘दिबां‌’चे नाव द्या; भाजपचे लक्षवेधी आंदोलन

पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी …

Leave a Reply