Breaking News

पनवेल मनपा क्षेत्रातील रस्ते होणार खड्डेमुक्त!

पनवेल ः प्रतिनिधी

पावसाळा संपताच पनवेल महापालिका क्षेत्रातील पनवेलसह नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघरमधील रस्ते दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या पाचही ठिकाणच्या रस्ते दुरूस्तीची कंत्राटे वेगवेगळ्या कंत्राटदारांना दिली गेली आहेत. त्यामुळे लवकर रस्ते खड्डेमुक्त होऊन नागरिकांचा प्रवास सुलभ होणार आहे. खारघरमधील काही रस्ते जे सिडकोकडे होते त्या रस्त्यांचे पनवेल महापालिकेच्या व सिडकोच्या अभियंत्यांनी संयुक्तपणे सर्वेक्षण केले. सिडकोच्या अभियंत्यांसोबत महापालिकेने चर्चा करून त्यानुसार ज्या रस्त्याचे डीएलपी (डिफेक्ट लायब्लिटी पिरीयड) अजून शिल्लक आहे, तेथील काम सिडकोचे कंत्राटदार करणार आहेत. पनवेल शहरात सध्या आनंद नगरमधील आदर्श हॉटेल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, जय भारत नाका रस्ते दुरूस्तीचे काम झाले आहे. आगरी समाज हॉल ते गावदेवी मंदिर रस्ता येथील रस्ते दुरूस्तीचे काम सुरू आहे. कामोठ्यात खांदेश्वर स्टेशन परिसर, सेक्टर 25जवळील अक्षर बिल्डिंग येथील रस्ते दुरूस्तीचे काम सुरू झाले आहे. खारघरमधील थ्री मंकी पाँईट ते उत्सव चौकपर्यंतचे रस्ते दुरूस्तीचे काम सुरू आहे तसेच सेक्टर 4मधील रस्ते दुरूस्ती सुरू आहे. कळंबोलीत सेक्टर 15मधील मुख्य रस्त्यांच्या दुरूस्तीस सुरुवात झाली आहे. नवीन पनवेलमधील पोदी येथील रस्ते दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. या वर्षी झालेल्या प्रचंड पावसामुळे महापालिका क्षेत्रातील अनेक नोडमधील रस्ते खराब झाले आहेत. या सर्व रस्ता दुरूस्तीच्या कामाची जबाबदारी आयुक्त गणेश देशमुख यांनी एका-एका कनिष्ठ अभियंत्याकडे सोपविली आहे. हे कनिष्ठ अभियंते कंत्राटदाराकडून काम लवकर पूर्ण करून घेत आहेत. येत्या महिनाभरात ही रस्ता दुरूस्तीची कामे पूर्ण होणार आहेत, असे शहर अभियंता संजय जगताप यांनी सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply