Breaking News

राज्यात अनेक नवे उद्योग येणार -मुख्यमंत्री

मुंबईत : प्रतिनिधी

आयोजित रोजगार मेळाव्यात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात अनेक नवे उद्योग आणत असल्याची माहिती दिली. दोन-तीन प्रकल्प कुठे गेले हे आरटीआयमधून समोर आले आहे. त्यातून सत्य समोर येईल. प्रकल्प का गेले? कोणामुळे गेले? कधी गेले? हे समोर येईल. उपमुख्यमंत्र्यांनीही पुराव्यानिशी मांडले आहे, असे सांगून आम्ही नवे उद्योग आणत असून त्यात राज्याचे हित आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांना फायदा होईल, राज्य स्वयंपूर्ण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. केंद्र सरकार राज्य सरकारच्या पाठीशी आहे. राज्याला केंद्राकडून विकासासाठी निधी मिळत आहे. गेल्या वेळी प्रस्ताव पाठवला असता 14 हजार कोटी मंजूर करण्यात आले. एक रुपयाही कमी केला नाही, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, सरकार बदल्यानंतर चैतन्य आले आहे. सर्व सण साजरे होत असून आनंदाचा शिधाही आम्ही दिला, पण काही ठिकाणी पोहचला नाही म्हणून लगेच त्याच्यावर बोट ठेवण्यात आले. राज्यात एक नकारात्मकपणा होता, त्यात आम्ही सकारात्मकपणा आणला आहे. मी व उपमुख्यमंत्री आम्ही दोघे धडाधड निर्णय घेतले. आमचे गतिमान सरकार असून नवीन उद्योग आणण्याचा प्रयत्न आहे. जपानच्या कंपनीने बीकेसीत दोन हजार 67 कोटींमध्ये जागा घेतली आहे. ते 500 कोटी खर्च करणार आहेत. यामधून पाच ते सहा हजार लोकांना नोकर्‍या मिळतील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. बीकेसीत परदेशी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.

येत्या आठवडाभरात साडेअठरा हजार जागांसाठी पोलीस भरतीची जाहिरात निघणार आहे. महिनाभरात साडेदहा हजार पदे ग्रामविकास विभागामार्फत भरली जाणार आहेत.

-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री 

महाराष्ट्रासाठी दोन लाख कोटींचे प्रकल्प मंजूर; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मोठी घोषणा

मुंबई ः महाराष्ट्रासाठी दोन लाख कोटींचे 225 प्रकल्प मंजूर करण्यात आले असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 3) दिली. राज्य सरकारतर्फे मुंबईत आयोजित रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. त्या वेळी पंतप्रधान मोदींनी ऑनलाइन संवाद साधत महाराष्ट्रात भविष्यात तरुणांसाठी रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला. केंद्र सरकारच्या वतीने देशभरात 75 हजार रोजगार देण्याचा महासंकल्प करण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील दोन हजार जणांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री, अधिकारी उपस्थित होते. आज देशभरात पायाभूत सुविधा, माहिती-तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमध्ये सरकार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहे. त्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. महाराष्ट्रात दोन लाख कोटींपेक्षा जास्त 225 प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांवर काम सुरू आहे किंवा सुरू होत आहे. महाराष्ट्रात रेल्वेसाठी 75 हजार कोटी आणि रस्ते विकास प्रकल्पासाठी 50 हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, स्टार्टअप, लघु उद्योगांना संभाव्य आर्थिक मदत सरकार देत आहे, जेणेकरून तरुणांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. सरकारच्या प्रयत्नांमधून रोजगाराच्या संधी दलित, आदिवासी, महिलांना समान स्वरूपात उपलब्ध होत आहे. गेल्या आठ वर्षांत आठ कोटी महिला सेल्फ हेल्प ग्रुपशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांना साडेपाच लाख कोटींची मदत देण्यात आली आहे. या ग्रुपशी जोडलेल्या महिला इतर महिलांनाही रोजगार देत आहेत, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. केंद्र सरकार पायाभूत सुविधांवर खर्च करीत असताना त्यातून रोजगाराच्या लाखो संधी निर्माण होतात. भविष्यात महाराष्ट्रात तरुणांसाठी रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही पंतप्रधानांनी या वेळी व्यक्त केला.

Check Also

सरके चुनर… हटाव मोहीम सफल

गाणं कोणतेही का असेना ते लिहिताना, स्वरबद्ध करताना, त्यावर संगीतसाज चढवताना, त्याचे चित्रीकरण करताना, त्यावरची …

Leave a Reply