कशेडी घाटात रिक्षाचालकासह तीन विद्यार्थिनींचा अपघाती मृत्यू
पोलादपूर : प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटातील चोळई येथील उतारावर एक डम्पर उलटला. या डम्परमधील राखेचा ढिगारा जवळून जाणार्या रिक्षेवर कोसळून चालकासह डीएडच्या तीन विद्यार्थिनींचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. 7) रात्री सव्वासातच्या सुमारास घडला. या प्रकरणी दारू पिऊन वाहन चालवून अपघात करणार्या डम्परचालकाविरुद्ध पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेडकडून भोरकडे राख घेऊन जाणारा आयवा डम्पर (एमएच 12-एमव्ही 3738) चोळई गावाच्या हद्दीत तीव्र वळण उतारावर चालक मधुकर तुळशीराम वाघमारे (वय 50, रा. वडगाव हाळ, ता. भोर, जि. पुणे) याने ब्रेक दाबल्याने उलटला. त्याचवेळी तेथून एक रिक्षा (एमएच 06-बीव्ही 2313) जात होती. डम्पर उलटल्याने त्यातील राखेचा ढिगारा रिक्षावर आला. अपघातानंतर डम्परचालकाने घटनास्थळावरून पोबारा करण्यासाठी काही वाहनांकडे लिफ्टही मागितली, मात्र अपघाताच्या आवाजाने चोळईतील ग्रामस्थ रस्त्यावर आल्याने त्याला तेथून पळून जाण्यात यश आले नाही. या वेळी त्याने डम्परमधून कोसळलेल्या राखेच्या ढिगार्याखाली एक रिक्षा असल्याचे प्रत्यक्षदर्शींना सांगितले. त्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू झाले.
या अपघातामध्ये रिक्षचालक अमाज उमर बहूर (वय 46, रा. गोरेगाव, ता. माणगाव, जि. रायगड) याच्यासह खेड येथे डीएडची परीक्षा देऊन परतणार्या विद्यार्थिनी हानिमा अब्दुल सलाम पोपेरे (वय 23, रा. नांदवी, ता. माणगाव), अलिया सिद्दीक बहूर (वय 20, रा. गोरेगाव, ता. माणगाव) आणि नाजनीन मुकीद करबेलकर (वय 22, रा. वावे, ता. पोलादपूर) यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातग्रस्त रिक्षा आणि मृतदेह महत्प्रयासाने बाहेर काढण्यात आले. सर्व मृतदेह पोलादपूर ग्रामीण रुग्णालयमध्ये नेऊन शवचिकित्सा व विच्छेदन करण्यात आले.
या अपघाताची खबर चोळईतील शंकर दिनकर जगताप यांनी दिल्यानुसार पोलादपूर पोलीस ठाण्यात डम्परचाक मधुकर वाघमारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारकडून पाच लाखांची मदत
या अपघाताची खबर कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक मृताच्या वारसांना राज्य सरकारतर्फे पाच लाख रुपये सानुग्रह मदत जाहीर केल्याची माहिती रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ट्विटरवरून दिली, तर महाडचे आमदार भरत गोगावले यांनीही माजी जि. प. उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्यासह ग्रामीण रुग्णालयात जाऊन मृतांच्या आप्तपरिवाराची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.